Savalyachi Janu Savali upcoming twist: काही दिवसांपासून सावलीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होत असलेली दिसत आहे. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य आता सर्वांसमोर आले आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील येत असलेले असे ट्विस्ट कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
‘सावळ्याची जणू सावली’ ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील सावली व सारंग हे प्रेक्षकांचे लाडके आहेत. प्रेमळ, शांत, समजूतदार, घरच्यांसाठी काहीही करणारी सावली सर्वांची मने जिंकते. तर सारंग तिच्यावर निरपेक्ष प्रेम करतो. तिच्यावर विश्वास ठेवतो. संपूर्ण जग तिच्या विरोधात असलं तर तो तिच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो.
सारंगचे सावलीवर इतके प्रेम असूनही सावलीने त्याच्यापासून आणि काहींना वगळता सर्वांपासून तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य लपवून ठेवले होते. ती वर्षानुवर्षे गायिका भैरवी वझेच्या मुलीसाठी तारासाठी गाणे गात होती. तारा ही लोकप्रिय गायिका म्हणून मात्र, हे सत्य तिच्यासह तिच्या कुटुंबियांना आणि जगन्नाथ यांना माहित होते. इतरांपासून हे सत्य लपवले होते. ती भैरवीला दिलेल्या वचनात अडकली होती.
जेव्हा सारंगला या सगळ्याबद्दल माहित झाले, तेव्हा ते सत्य त्याने जगासमोर आणले. सावलीला तिची ओळख मिळवून दिली. आता या सगळ्यानंतर मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. भैरवी आणि सावली समोरासमोर आल्या आहेत.
भैरवी आणि सावली समोरासमोर येणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की भैरवी जगन्नाथला म्हणते, “जगन्नाथ तुझ्यामुळे मी सगळं गमावलं आहे. आता तुला मी सोडणार नाही.” असे म्हणत ती जगन्नाथकडे बोट दाखवते. तितक्या सावली तिथे येते आणि तिचा हात खाली घेते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सावली भैरवीला म्हणते, “खबरदार माई, माझ्या घरच्यांबद्दल एक शब्दही बोललात ना तर…”, तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच भैरवी म्हणते, “तर..? अगं सावली, आता तर हे युद्ध सुरू झालं आहे.” पुढे सावली म्हणते, “..आणि हे युद्ध गुरू आणि शिष्यामधील असेल. आता ही सावली बदलली आहे. बघूया कोण जिंकतंय? तुमचा अहंकार की माझी भक्ती?”, असे म्हणत सावली भैरवीला उत्तर देते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “भैरवीच्या अहंकारासमोर सावलीची भक्ती उभी ठाकणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, जगन्नाथ सावलीला मुलगी मानतो, तर सावलीदेखी त्याला वडील मानते. त्यांच्यातील या नात्याचे कायमच कौतुक होताना दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार, अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे.
