Savalyachi Janu Savali upcoming twist: गुरूने दिलेल्या विद्येसाठी शिष्य कायमच त्याचा ऋणी असतो. मात्र, सावळ्याची जणू सावली मालिकेत गुरू आणि शिष्य दोघेही एकमेकांसमोर येणार आहेत.
सावळ्याची जणू सावली या मालिकेत भैरवी आणि सावली एकमेकींसमोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झाला. तेव्हा तिला टीकेचा सामना करावा लागला. वझे घराण्याची गाण्याची परंपरा जपण्यासाठी भैरवीने स्वत:च्या मुलीला गाणे गाता येत नाही, म्हणून तिने सावलीला इतकी वर्षे तिच्यासाठी गायला लावले. मात्र, जगासमोर ताराला गायिका म्हणून उभे केले.
जेव्हा सारंगला या सगळ्याबद्दल समजले तेव्हा त्याने सर्वांसमोर हे सत्य आणले. त्यानंतर भैरवी एकटी पडली. त्यानंतर तिने तिच्या श्रृगांराचा त्याग केला. तसेच, सावली, ऐश्वर्या, सारंग आणि इतरांचा बदला घेईन असा तिने निर्धार केला. सावली आणि सारंग नेहमी एकत्र येत भैरवीचे कारस्थाने उलटवून लावतात. नुकतेच भैरवीने सावलीला जुगलबंदीचं आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. या निमित्ताने गुरू आणि शिष्य समोरासमोर येणार आहेत. मात्र, या जुगलबंदीवेळी भैरवी सावलीविरोधात कारस्थान करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
भैरवी सावलीविरुद्ध करणार कारस्थान
आता सावळ्याची जणू सावली मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये भैरवी आणि सावली एकाच मंचावर असल्याचे पाहायला मिळत आहे. भैरवी गाणे गात आहे. त्यादरम्यान सावली पाणी पिते. यावेळी सावलीला गाणे गाता येऊ नये यासाठी भैरवीने कारस्थान केलेले असते.
तिने सावलीच्या वहिनीच्या मदतीने सावलीच्या पाण्यात औषध मिसळले असल्याचे पाहायला मिळते. सावलीला मंचावर गाता येऊ नये, असा त्यामागे उद्देश असतो. जेव्हा भैरवीचे गाणे संपते आणि ती सावलीला गायला सांगते तेव्हा सावली गात नाही. तिच्या डोळ्यांतून पाणी येते. भैरवी सावलीला म्हणते की सावली काय झालं? गळ्यातून सूर फुटत नाहीत का? सावली गात नसल्याचे पाहून सारंग, त्याचे आई-वडील, जगन्नाथ आणि त्याची पत्नी यांच्या चेहऱ्यावर काळजी पाहायला मिळते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “भैरवीच्या षडयंत्रामुळे होणार का सावलीचा पराभव?”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता सावली का रडत आहे, तिला गाणे गाता येईल का, मालिकेत पुढे काय होणार, सावली भैरवीला उत्तर देणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. आता मालिकेत नेमकं घडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

