Savalyachi Janu Savali Upcoming Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सध्या नवीन वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. सावली व सारंग यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. तिलोत्तमा, राजकुमार, भैरवी या सगळ्यांमुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले. त्यानंतर ते एकमेकांपासून दुरावले.
सावलीने जुळ्या बाळांना जन्म दिला; मात्र राजकुमारला तिला व तिच्या बाळांना संपवायचे होते. त्यामुळे त्याने तिला मारण्यासाठी काही गुंडांना पाठवले. सावलीने तिला व तिच्या बाळांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. एक बाळ गुंडांच्या हाती लागले. मात्र, राजकुमारने पाठवलेले गुंड त्या बाळाला मारू शकले नाहीत. याचे कारण म्हणजे सारंग तिथे आला आणि त्याने बाळाला वाचवले. ते बाळ कोणाचे आहे, हे सारंगला माहीत नव्हते. मात्र, त्या बाळाचा सांभाळ करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यामुळे सारंगला त्याने ज्या बाळाला वाचवले, ती त्याचीच मुलगी असल्याचे माहीत नाही. दुसरीकडे सावली मेहेंदळे कुटुंबापासून दूर तिच्या मुलासह राहत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सारंग व त्याच्या मुलाची म्हणजेच अबीरची भेट झाली आहे. तसेच, सावली व तिच्या मुलीची ओवीची भेट झाली आहे. आता सावली व सारंग कधी समोरासमोर येणार, याची प्रेक्षक वाटत पाहत आहेत. मात्र, याआधीच अबीर मेहेंदळे कुटुंबातील एका व्यक्तीसमोर जाणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सावलीच्या मदतीला येणार ‘ती’ व्यक्ती
झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अबीर खेळत असतो. तितक्यात एक कार येते. भरधाव कार पाहून अबीर ओरडतो. तिथे गर्दी जमते. गाडीतील माणसाला तो म्हणतो की, डोळे फुटले का तुझे? त्या गाडीतून राजकुमार बाहेर येतो. तो अबीरवर हात उचलतो. ते पाहून गर्दीतील एक माणूस म्हणतो की, त्याच्या अंगावर चिखल उडवला. त्याला सॉरी बोला. त्यानंतर राजकुमार सॉरी म्हणतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावली अबीरला घेऊन पळत असते. तितक्यात तिच्यासमोर एक गाडी येऊन उभी राहते. सुरुवातीला सावलीच्या चेहऱ्यावर भीती दिसते. त्यानंतर एक व्यक्ती त्यातून उतरतो, त्याला पाहून सावलीच्या चेहऱ्यावरील भीती जाते आणि आनंद पाहायला मिळतो. ती व्यक्ती म्हणजे जगन्नाथ आहे, ज्याला सावली बाबा म्हणते. सावलीला पाहून जगन्नाथच्या डोळ्यांतून अश्रू येतात. तसचे, जगन्नाथचा लूक काही प्रमाणात बदलल्याचे दिसते. त्याच्या हातात काठी पाहायला मिळते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘सावली आणि अबीरच्या मदतीला जगन्नाथ येणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, राजकुमारचे कारस्थान यशस्वी होणार की सावली खरी होती, हे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
