Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सध्या अनेक वळणे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येत असून सावली व सारंगच्या आयुष्यात चढ-उतार येत आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तिलोत्तमा, राजकुमार व भैरवी यांच्यामुळे सावली व सारंग यांच्यात गैरसमज निर्माण झाले. त्यांच्यात भांडणे झाली आणि ते वेगळे झाले. राजकुमारने सावली व तिच्या जुळ्या मुलांना मारण्यासाठी काही गुंड पाठवले होते. त्यावेळी सावलीपासून तिची मुलगी वेगळी झाली. पण, त्या गुंडांची गाठ सारंगबरोबर पडली. त्याने त्या मुलीला वाचवले. तिला घरी आणले, तिला स्वत:चे नाव दिले. त्याचीच मुलगी असल्याचे त्याला माहीत नाही, मात्र वडिलांच्या मायेने सारंगने ओवीचा सांभाळ केला. तर दुसरीकडे, सावलीने मुलगा अबीरला एकटीने वाढवले.
आता अनेक वर्षानंतर सावली व सारंग एकमेकांसमोर आले आहेत. त्यांच्यातील गैरसमज अजूनही तसेच आहेत. मात्र, त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम इतक्या वर्षांनंतरही तसेच आहे. एकमेकांच्या संकटाच्या काळात ते एकमेकांसाठी धावून जातात. आजही राजकुमार, भैरवी व तिलोत्तमा त्यांना वेगळे करण्यासाठी, त्यांच्यातील गैरसमज तसेच राहावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते.
“देवा प्लीज माझ्या मुलांना वाचव”
झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सावली व अबीर शाळेतून येत आहेत. तितक्यात पाठीमागून एक गाडी येते. त्यातून दोन माणसे खाली उतरतात आणि ओवीला त्या गाडीत जबरदस्तीने बसवतात आणि तिथून पळून जातात. अबीर ओवीला गुंडांपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण, ते त्याला ढकलून देतात. अबीर ओवी म्हणून मोठ्याने ओरडतो.
सावली झोपेतून जागी होते. ती अबीर असे म्हणते. तिला कशाचातरी धक्का बसल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ती देवाचा धावा करते. ती म्हणते, “देवा प्लीज माझ्या मुलांना वाचव.” त्यानंतर एका दगडावर हातात काठी घेतलेला एक व्यक्ती उभी असल्याची दिसते. ती व्यक्ती पाठमोरी उभी आहे. ओवीचे अपहरण करून ज्या गाडीत गुंड बसले होते, ती गाडी तिथेच आल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावलीच्या हाकेला पंढरीचा विठूराया धावून येणार”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे कारस्थान कोणी केले आहे, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
