Savalyachi Janu Savali upcoming twist: लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची ओळख आहे. या मालिकेतील सावली सर्वांच्या मनावर राज्य करते. सावली आणि सारंग यांची जोडी प्रेक्षकांना आवडते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे इतके दिवस भैरवीमुळे सावलीच्या गाण्याचे सत्य सर्वांसमोर आले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी सारंगला जेव्हा समजले की खरी गायिका तारा नाही तर सावली आहे, तेव्हा त्याने ते सत्य संपूर्ण जगासमोर आणले; त्यामुळे भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर आला. मात्र, सावलीसाठी अनेक संधी खुल्या झाल्या. आता अशीच आणखी एक संधी सावलीला मिळणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
राधिका भिडेची ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत एन्ट्री
झी मराठी वाहिनीने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली सारंगला विचारते की काय सरप्राईज आहे मला सांगा. तितक्यात कोणीतरी चालत आत येते. ती राधिका भिडे असल्याचे पाहून सावलीला आनंद होतो. तिलोत्तमाच्या चेहऱ्यावरदेखील आनंद दिसतो.
“तिचं गाणं खराब करायचं…”
सावली राधिकाजवळ जाते आणि तिला म्हणते की मला तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. राधिका म्हणते मलासुद्धा तुला भेटून छान वाटत आहे. त्यानंतर सावली असे म्हणते की, माझं पहिलं गाणं तेही राधिका मॅडमबरोबर? सावली त्यानंतर तयारी करत असल्याचे दिसते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, स्टुडिओमधील साऊंड रेकॉर्डिस्टला भैरवीचा फोन येतो. ती त्याला सांगते की सावलीचं गाणं मी सांगते त्याच पद्धतीने रेकॉर्ड करायचं, तिचं गाणं खराब करायचं. त्यानंतर भैरवी हसत असल्याचे दिसत आहे तर सावली गाणे गात असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “राधिकाबरोबर पहिलं गाणं गाण्याचं सावलीचं स्वप्न होईल का पूर्ण?”, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी उत्तम मालिका असल्याचे लिहित मालिकेचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी राधिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
राधिकाबद्दल बोलायचे तर ती नुकतीच आय पॉप स्टार या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. तिची गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसेच आय पॉपस्टारमधील तिच्या परफॉर्मन्सचे वेळोवेळी कौतुक झाले होते. आता सावळ्याची जणू सावली मालिकेत तिची भूमिका किती काळासाठी असणार, नेमकी काय भूमिका असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

