Savalyachi Janu Savali upcoming twist: आपल्या जवळच्या माणसांसाठी अनेक गोष्टी केल्या जातात, अनेकदा मान-अपमान विसरले जातात. सावळ्याची जणू सावली या मालिकेत सावली व सारंग यांच्या आयुष्यात उलाथापालथ झाली आहे. काही वर्षांपूर्वी तिलोत्तमा, भैरवी व राजकुमार यांच्यामुळे ते वेगळे झाले. त्यांच्यात गैरसमज झाले. सावलीपर्यंत घटस्फोटाचे पेपर पोहोचवले गेले, ते पेपर सारंगनेच पोहोचवले, असे सावलीला वाटते. आता अनेक वर्षांनंतर सावली व सारंगची भेट झाली आहे. त्यांच्यात आजही प्रेम आहे; मात्र त्याचबरोबर त्यांच्यात गैरसमजही असल्याने एकमेकांबद्दल मनात राग आहे.

आता या सगळ्यात सावली पुन्हा एकदा मेहेंदळे कुटुंबात जाणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता ती सारंगच्या घरी का जाणार आणि असे काय घडले, ज्यामुळे तिला हे करावे लागणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सारंग सावलीला काय म्हणाला?

झी मराठी वाहिनीने, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, ओवी आजारी आहे. ती बेशुद्धावस्थेतच सावलीची आठवण काढत आहे. ती म्हणते, “अबीरची आई मला भेटायचं आहे.” ओवीची अवस्था पाहून सारंग सावलीच्या घरी येतो. त्याला पाहून सावली रागाने त्याला विचारते, “तुम्ही इथे का आला आहात?”, सारंग तिला सांगतो, “सावली, मी इथे ओवीसाठी आलो आहे. तिची प्रकृती बिघडली आहे. तापाच्या ग्लानीत ती तुझं नाव घेत आहे.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावली मेहेंदळेंच्या घराबाहेर आहे. मात्र, घरात जावे की नाही, असा प्रश्न तिला पडला असल्याचे दिसत आहे. ती घरात जात असते; मात्र दरवाजाबाहेरच थांबते. तिला सारंगने कानाखाली मारली होती, ते आठवते. तिलोत्तमाने तिला हाताला धरून, ओढत घराबाहेर काढले होते, हे आठवते. त्या घरातील कटू आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येतात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘ओवीच्या काळजीपोटी सावली टाकेल का सासरच्या घरात पुन्हा पाऊल?’, अशी कॅप्शन दिली आहे.

आता सावली ओवीसाठी घरात जाणार का, ती नेमकं काय करणार, सारंग व सावलीमधील गैरसमज कधी दूर होणार, त्यांचे नाते पूर्वीसारखे कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.