Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सतत भांडणे, वादविवाद, समज-गैरसमज पाहायला मिळतात. तिलोत्तमा, भैरवी, राजकुमार हे कायम सावलीला त्रास देण्यासाठी कटकारस्थान करत असतात. ती मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहावी यासाठी प्रयत्न करतात.
राजकुमारची दुसरी पत्नी मोनिकादेखील या सगळ्यांना मदत करते. तसेच, ती सारंगची मुलगी ओवीलादेखील त्रास देताना दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून सावली व तिलोत्तमा यांच्यात गैरसमज आहे. आता मात्र, मालिकेत वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
या प्रोमोत पाहायला मिळते की, ओवी व अबीर खेळत असतात. मोनिका तिथे येते आणि ओवीचा तिला चुकून धक्का लागतो. ओवी घाबरते आणि मोनिकाला म्हणते, “सॉरी काकू.” त्यानंतर मोनिका सुरुवातीला तिच्यावर हात उचलत असल्याचे दिसते. पण, नंतर ती अचानक हसत म्हणते, “सॉरी नकोय. काकूला ओवीचा पापा हवाय.” मोनिकाचे हे बोलणे ऐकून ओवीला आश्चर्य वाटते. तिथेच उभा असलेला अबीर म्हणतो, “बाप्पा घरी आल्यानंतर मोनिका काकू सुधारल्या आहेत.”
तिथेच उभ्या असलेल्या सावलीला हे सगळे पाहून आनंद होतो. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. तितक्यात तिथे तिलोत्तमा येते. ती सावलीचे अश्रू पुसते आणि तिला म्हणते, “आता अश्रू पुसायचे आणि पुढचे १० दिवस सगळ्यांना प्रेमानं जपायचं.” त्यानंतर ती सावलीला मिठी मारते.
प्रोमोमध्ये पुढे श्री गणेशाच्या आगमनामुळे घरात आनंदी आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “गणरायाच्या आगमनाने मेहेंदळे घरात आनंद फुलणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी हॉर्ट इमोजी शेअर केल्या आहेत. आता मालिकेत नेमकं काय घडणार, सावली व सारंग यांचे नाते पूर्वीसारखे होणार का, त्यांच्यातील गैरसमज दूर होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
