विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सविता मालपेकरांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘मुळशी पॅटर्न’, ‘पांडू’, ‘काकस्पर्श’ अशा सुपरहिट सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत. सविता मालपेकर त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकून घेतात. जवळपास वर्षभरापूर्वी त्यांनी ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत त्यांनी बाई आजीची भूमिका साकारली होती. बाई आजीला सर्वांचं खूप प्रेम मिळालं.

पण, या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान, अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यात एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. ‘शिवा’ मालिका सुरू असताना सविता मालपेकर जवळपास ३ महिने डिप्रेशनमध्ये होत्या. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सनी या मालिकेची निर्मिती केली होती. त्यामुळे डिप्रेशनच्या या कठीण काळात अमोल कोल्हेने मला खूप जास्त सांभाळून घेतलं असं सांगत सविता मालपेकरांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सविता मालपेकर ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मी ‘शिवा’ मालिकेत काम केलंय, ती टीम खूप छान होती. सेटवरची सगळी मुलं छान काम करत होती. पण, त्या काळात मी थोडी डिप्रेशनमध्ये होते. जवळपास तीन महिने मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेले होते. नेमकं काय झालं…हे मला आजही सांगता येणार नाही. त्यादरम्यान, मी एका हिंदी मालिकेतही काम करत होते आणि ‘शिवा’ मालिका अशा दोन्ही सिरियल्समध्ये मी काम करत होते. माझ्या आईचं निधन झालं आणि त्यानंतर हा डिप्रेशनचा काळ सुरू झाला. कारण, ती अचानक सोडून गेली. रात्री माझ्याशी नीट बोलली आणि अचानक सकाळी ती नाहीये…याचा मनावर प्रचंड परिणाम झाला होता. मला सारखं रडायला यायचं, माझी चिडचिड व्हायची.”

त्या पुढे सांगतात, “मी सारखी रडत बसायचे…हा बोलला तरी रडायचे, दुसरं कुणी काही बोललं तरी मी रडायचे. चिडचिड होऊन मी सुद्धा काहीतरी बोलायचे. पण, या काळात अमोल कोल्हे आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसने मला खूप सांभाळून घेतलं. झी मराठीचे EP त्यांनीही मला खूप सांभाळलं.”

“अमोल कोल्हेने मला तेव्हा प्रचंड सांभाळलं. विलास सावंतने मदत केली. सेटवर इतकं सांभाळून घेणं…ही मोठी गोष्ट आहे. मी तेव्हा सेटवर सुद्धा उशीरा जायचे…अर्थात यामुळे गैरसमज झाला असेल, काही लोकांनी या गोष्टीची बोंबाबोंब सुद्धा केली असेल. पण, तेव्हा माझी परिस्थिती फार वेगळी होती. आई गेल्यानंतर मी तीन महिने डिप्रेशनमध्ये होते. मला काहीच कळत नव्हतं. त्या डिप्रेशनमधून मला माझ्या भावंडांनी बाहेर काढलं. माझी मुलगी, माझी नात, माझी भावंडं या सगळ्यांनी मला त्या कठीण काळात साथ दिली. नाहीतर आज ही सविता मालपेकर जिवंतच राहिली नसती!” असं सांगत सविता मालपेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.