Zee Marathi Savlyachi Janu Savali Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार येणार आहे. या मालिकेत आता लीप येणार आहे. पण, या लीपनंतर सावली-सारंग एकत्र नसतील. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत एक नवीन वळण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सारंगवर चिडून सावली घर सोडून जाते. यांच्या आयुष्यात आता दोन चिमुकल्यांची एन्ट्री झालीये. त्यांची मुलगी सारंगजवळ आणि मुलगा सावलीजवळ राहत असतो. या दोन चिमुकल्यांची झलक सुद्धा या प्रोमोमध्ये दिसतेय.
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत लोकप्रिय बालकलाकार साईराज केंद्रे आणि वेदांती भोसले यांची एन्ट्री झाली आहे. साईराज “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावरील व्हिडीओमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. याशिवाय याआधी त्याने ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तर, वेदांती ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. ती यापूर्वी ‘लाफ्टर शेफ’ या हिंदी कुकिंग शोच्या एका एपिसोडमध्येही झळकली आहे.
वेदांती ( ओवी ) आणि साईराज ( अबीर ) हे दोघंही ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली-सारंगच्या मुलांची भूमिका साकारत आहे. ओवी देवळात प्रार्थना करणाऱ्या सावलीजवळ जाऊन म्हणते, “हे तुमचं ऐकतात का? देवाला सांगा ना…माझ्या आईबरोबर माझी भेट घालून द्यायला.” यावर सावली तिला प्रेमाने सल्ला देते आणि छोट्या ओवीला विठुरायाची मूर्ती भेट देत म्हणते, “विठुरायाबरोबर मैत्री कर तुला कधीच एकटं वाटणार नाही.”
तर, दुसरीकडे सारंग अबीरशी मैत्री करतो आणि त्याला गॉगल गिफ्ट देतो. सारंग-सावली यानंतर या मुलांमुळे आमनेसामने येतात. यावेळी दोघांमध्ये निर्माण झालेला दुरावा स्पष्टपणे जाणवतोय. आता नव्या वळणावर भेटलेले सावली-सारंग ओवी आणि अबीरला आई वडिलांचं प्रेम देणार का? हा प्रवास आता प्रेक्षकांना ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आता सारंग-सावलीमध्ये नेमका दुरावा का आला? आणि ओवी-अबीरमुळे यांच्यातील दुरावा मिटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका १३ एप्रिलपासून दुपारी १ वाजता प्रसारित केली जाणार आहे.
