Zee Marathi Savlyachi Janu Savali Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांना एक मोठा लीप पाहायला मिळाला. तिलोत्तमा सावली गरोदर असताना तिचा अपमान करून तिला घराबाहेर काढते. यावेळी सारंग सुद्धा आपल्या बायकोची ठामपणे बाजू घेऊ शकला नाही, याची खंत आजही त्याच्या मनात आहे. सावली मेहेंदळे कुटुंबापासून दूर जाऊन स्वत:चं एक वेगळं जग निर्माण करते. तिला जुळी मुलं होतात. पण, राजकुमारच्या कारस्थानामुळे तिची लेक तिच्यापासून दुरावते. सावली सध्या एकटी आपल्या मुलाचा सांभाळ करतेय.

सावलीच्या मुलाचं नाव आहे अबीर…तर, ओवीचा सांभाळ सारंग करतोय. पण, तिची ओळख त्याला अद्याप माहीत नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून सावली मेहेंदळे कुटुंबापासून वेगळी राहतेय पण, आता अखेर ती आपल्या सासुच्या समोर येणार आहे. ज्या सुनेला कोणतीही चूक नसताना केवळ गैरसमजातून धक्के मारून घराबाहेर काढलं…ती पुन्हा एकदा तिलोत्तमाला आव्हान देणार आहे.

सावली गुरूकुलमध्ये लहान मुलांना गाणं शिकवत असते आता हीच जागा हडपण्याचा तिलोत्तमाचा डाव असतो. ती जगन्नाथला सांगते, “ही गुरूकुलाची जागा मला हवीये.” यावर जगन्नाथ तिला म्हणतो, “तुला काय वाटतं? तुझ्यात आणि या जागेच्या मध्ये मी उभा आहे? तुझा सामना ज्या व्यक्तीशी आहे… ती व्यक्ती मी नाहीये! ती व्यक्ती तिथे उभीये”

इतक्यात मागून सावली येते. सावली सासुला ठणकावून सांगते, “ही सावली तुम्हाला या गुरूकुलाची वीट सुद्धा हलवू देणार नाही” आता सुनेने ओपन चॅलेंज दिल्यावर ‘स्वर सावली’ संगीत गुरूकुलाची ही जागा तिलोत्तमा कशी मिळवणार? ती कोणता नवीन डाव रचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिलोत्तमाला अद्याप सावलीच्या मुलाबद्दल काहीच समजलेलं नाहीये. आता अबीर भेटल्यावर तिलोत्तमा त्याच्याशी कसं वागेल याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असेल. २४ मे रोजी हा विशेष भाग प्रसारित केला जाईल. हा भाग दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

दरम्यान, सध्या ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दुपारी प्रेक्षकांच्या भेटीला येते. १३ एप्रिलपासून दुपारी १ वाजता ही मालिका ऑन एअर होते.