Sukanya Mone on Working In Serials: ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने या सध्या ‘कोण होतीस तू काय होतीस तू’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“आम्हाला घर चालवायचं आहे”
विविध मालिका, चित्रपटांत सुकन्या मोने काम करताना दिसतात. आता मात्र त्या त्यांच्या भूमिकेमुळे नाही तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सुकन्या मोने यांनी नुकताच नवशक्तीशी संवाद साधला. यावेळी मालिकेत काम करण्याबाबत सुकन्या मोने म्हणाल्या, “मराठी चित्रपट जे येतात, ते कसे चालतात. त्यात आमच्यासाठी काय भूमिका असतात.”
“आम्ही दोघेही नवरा-बायको या क्षेत्रात काम करतो, आम्हाला घर चालवायचं आहे. तर ते घर कसं चालवणार? जशी इतरांची स्वप्न असतात, तशी आमचीदेखील स्वप्नं असतात. आपल्याकडे घर, गाडी असावी; आपल्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावं, अशी स्वप्नं आमचीसुद्धा असतात. तर हे सगळं करण्यासाठी पैशांचं सोंग घेता येत नाही.”
मला प्रसिद्धी मिळाल्याने त्याची बाकींच्याना मदत….
“मालिकांनी आम्हाला इतकं मोठं केलं आहे, मालिकांनी आज आम्हाला स्थैर्य दिलं आहे. मला प्रसिद्धी मिळाल्याने त्याची बाकींच्याना मदत होते. एखाद्या रुग्णालयात आम्ही कोणाबरोबर गेलो तर लोक आम्हाला चेहऱ्यांनी ओळखतात आणि आमच्याबरोबर त्यांची पटापट कामं होतात. ‘आभाळमाया’मध्ये काम करत होते तेव्हा माझ्या भाचीला शाळेत ॲडमिशन पाहिजे होतं. तिथल्या मॅडमने एक सही करा, आम्ही ॲडमिशन देतो असे सांगितले, कारण ‘आभाळमाया’मध्ये माझी कुलगुरूची भूमिका होती.”
“आज मालिकेने मला ओळख दिली. आज संपूर्ण महाराष्ट्र मला माई म्हणून ओळखतो. मला अनेकांची पत्र येतात. त्यामध्ये लिहिलेलं असतं की, माझ्या बाबतीत अमुक अमुक गोष्टी झाल्या आहेत किंवा परदेशातील मुली, सुना ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील एखादा सीन बघून म्हणतात की मला तुमच्यामध्ये आई दिसते.”
दरम्यान, ‘आता कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत पुढे काय वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.