टेलीव्हिजनवरील अभिनेत्री शफक नाझने करवा चौथचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या धार्मिक ओळखीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सोशल मीडिया ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेत्री पारंपरिक लाल साडी, भांगेत कुंकू आणि हातात बांगड्या अशा पारंपरिक लूकमध्ये दिसली होती. मात्र, तिच्या फोटोंवरून सोशल मीडियावर काही जणांनी नकारात्मक कमेंट्स करत तिला ट्रोल केलं. यामुळे शफकने नाराजी व्यक्त केली. आता एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, दुसऱ्या धर्माशी संबंधित सण साजरा केल्याने तिचं धर्मांतर झालं असं होतं नाही. तसेच प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धांचा आदर करण्याचं आवाहनही तिने केलं.
अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर
“तर, अलीकडेच मी करवा चौथ साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले होते. यावेळी मी लाल साडी नेसली होती आणि भांगेत कुंकू भरलं होतं. खरं सांगायचं तर, ते फोटो खूप चांगले होते. मात्र, अचानक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये अपमानास्पद कमेंट्स, ट्रोलिंग पाहायला मिळालं. जणू काही कुंकू लावल्याने तुमचा धर्मच बदलतो,” असं ती म्हणाली.
तिने पुढे सांगितलं, “सर्वप्रथम मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. ज्यांना माहिती नाही, त्यांना मी सांगू इच्छिते की माझ्या पतीचं नाव झीशान आहे आणि ते मुस्लीम आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, मी कुंकू लावलं म्हणून माझा धर्म बदलत नाही किंवा मी मुस्लीम राहत नाही, असं होत नाही. धर्म इतका कमकुवत आहे का? धर्म इतका कमकुवत असतो का?” भारताच्या विविधतेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, वेगवेगळ्या संस्कृतीचे सण साजरे करणं यात काही चुकीचं नाही, त्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे. असं म्हणाली.
“भारताची हीच तर खासियत आहे. आपल्या देशात इतक्या विविध संस्कृती आहेत. त्यामुळे एखादा सण साजरा करण्यात गैर काय? मी तर असे अनेक सण साजरे करत आले आहे” असं तिने सांगितलं. सोशल मीडियावरून होणाऱ्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त करत शफकने पुढे म्हटलं की, प्रत्येकाच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. एखाद्याने घेतलेल्या वैयक्तिक निर्णयांवरून त्याला ट्रोल नाही केलं पाहिजे.”
शफकने करवा चौथ साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा वाद सुरू झाला. यावेळी तिने लाल साडी नेसली होती. भांगेत कुंकू आणि हातात लाल बांगड्या घालून तिने पारंपरिक लूक पूर्ण केला होता. तसेच करवा चौथच्या पूजेतील महत्त्वाचा भाग असलेली चाळणीही तिच्या हातात दिसत होती. काही फोटोंमध्ये तिचे पती झीशानदेखील तिच्यासोबत दिसले.हे फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं, “माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळातही मला पाहिलं आहे, अशा व्यक्तीसाठी मी आज सजले आहे. करवा चौथच्या शुभेच्छा!”
शफक नाझला पौराणिक मालिकेत ‘महाभारत’मध्ये कुंतीची भूमिका साकारल्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय ‘चिडिया घर’ या विनोदी मालिकेतील मयुरीच्या भूमिकेमुळेही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिने इतर अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं आहे.
