आपल्या वेगळ्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम हे आहेत. भाऊ कदम या नावाने प्रेक्षकवर्ग त्यांना ओळखतो. सध्या ते सीरियल किलर या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली, यामध्ये शाहरुख खानने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात त्यांनी साकारलेल्या शाहरुखबद्दल काय म्हटले होते, याबद्दल सांगितले आहे.

काय म्हणाले भाऊ कदम?

अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनेलला भाऊ कदम यांनी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये शाहरुख खान, सलमान खान त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते, त्यावेळचा काही लक्षात राहिलेला किस्सा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना भाऊ कदम यांनी म्हटले, “शाहरुख खान समोर बसलाय आणि त्याच्यासमोर मी शाहरुख करणार होतो. ती परीक्षाच होती. कारण काहीच संबंध नव्हता, मी कशानेच शाहरुख वाटत नव्हतो. गेटअप करूनदेखील मी शाहरुख वाटणार नव्हतो. पण शाहरुख खानसमोर जेव्हा शाहरुख साकारला तेव्हा त्यावेळी तो बोलला, हे लोकं कॉमेडियन नाहीत ते कलाकार आहेत आणि याने जे केलं ना त्यामुळे मी खूप हसलो, कारण याने सगळ्यांसारखं काहीच केलं नाही; माझ्यासारखं तर काहीच केलं नाही. याने आपलंच करून वेगळा शाहरुख साकारला; त्यामुळे तो त्याला आवडला, तो तसं बोललादेखील.”

“सलमान खान तर एका जोकला खूप हसत होता. सचिन तेंडुलकर आले होते, त्यांनीसुद्धा खूप आनंद घेतला. खूप मोठ्या लोकांसमोर काहीतरी करता आलं, हे भाग्य आहे”, असे भाऊ कदम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: नीलम कोठारीने पहिल्यांदाच सांगितलं ऋषी सेठियापासून घटस्फोट घेण्याचं कारण; म्हणाली, “मला माझे नाव बदलण्यास…”

दरम्यान, भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. याशिवाय ते नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘टाइमपास’, ‘नशीबवान’, ‘जाऊंद्याना बाळासाहेब’, ‘बाळकडू’, ‘टाइमपास ३’, ‘पांडू’, ‘हाफ तिकीट’, ‘बॉइज’, ‘व्हीआयपी गाढव’ अशा चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Story img Loader