‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सलमान खान, शाहरुख खान असे सगळे कलाकार या सेटवर चित्रपटांच्या प्रमोशनसाठी आले होते. २०१८ मध्ये शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा या शोमध्ये ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. यावेळी निलेश साबळेने या दोघांना शोमध्ये मराठी गाण्यावर एन्ट्री घेण्यासाठी खास विनंती केली होती. यादरम्यानचा किस्सा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

निलेश साबळे ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत म्हणाला, “हिंदीतल्या कोणत्याही कलाकाराला मी किंवा चॅनेलने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये बोलावलं नव्हतं. ते स्वत:हून यायचे कारण, त्यांना त्यांच्या चित्रपटांचं प्रमोशन करावं लागायचं. मग शाहरुख असो किंवा सलमान खान असो…तेव्हा सगळे स्वत:हून ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आले होते. ही मंडळी आल्यावर आम्ही प्रयत्नपूर्वक त्यांना मराठी बोलायला लावलं…जेणेकरून ते प्रेक्षकांना कनेक्ट होईल.”

शाहरुख खान सर जेव्हा सेटवर आले होते…त्यादरम्यानचा एक किस्सा तुम्हाला सांगतो असं सांगत निलेश पुढे म्हणाला, “जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुख सर रात्री १२ वाजता सेटवर आले होते. ते ‘चला हवा येऊ द्या’मध्ये तेव्हा दुसऱ्यांदा आले होते. याशिवाय शाहरुख सरांबरोबर अनुष्का शर्मा सुद्धा येणार होती. ते लोक त्यांच्या व्हॅनिटीमध्ये बसले होते. तेवढ्यात चॅनेलचे इपी माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले, “शाहरुख सर आलेत..तर आपण त्यांना मराठी गाण्यावर एन्ट्री देऊयात. पुढे, त्यांच्या चित्रपटाचं गाणं ठेवू आणि ते जरा डान्स करतील का? तू त्यांना विचारून घे.” तर, माझं असं झालं ठिके मी शाहरुख सरांना विचारतो…कारण, शक्यतो ते नाही म्हणणार नाहीत.”

निलेश म्हणाला, “मी सरांच्या व्हॅनिटीत गेलो…तोपर्यंत त्यांनी अनुष्काला ‘चला हवा येऊ द्या’च्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. शाहरुख सरांनी मला आधीच रात्री १२ ते ३ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. आता इपीच्या सांगण्याप्रमाणे, मी शाहरुख सरांना ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्यावर एन्ट्री घेण्याबद्दल सांगितलं. त्यांना सांगितलं की, महाराष्ट्राचे मोठे सुपरस्टार आहेत दादा कोंडके त्यांच्या गाण्यावर आपण तुमची एन्ट्री करुयात. अर्थात दादा कोंडके यांचं नाव ऐकून ते लगेच तयार झाले. फक्त तुम्ही गाण्याच्या ओळी मला सांगा, लिप्सिंक करताना प्रॉब्लेम होतो…असं सगळं आमचं बोलणं झालं आणि मी व्हॅनिटीच्या बाहेर आलो.”

अभिनेता पुढे सांगतो, “मी जेव्हा बाहेर आलो…तेव्हा तिथे इपी देखील होता, मी आत सरांशी बोलेपर्यंत त्या इपीने जवळपास पाच गाण्यांची यादी बनवली होती. तो कोरिओग्राफरबरोबरच बसला होता. ‘हिल हिल पोरी हिला’, ‘गोमू संगतीनं’ अशी सगळ्या गाण्यांची ती यादी होती. एकूण तो परफॉर्मन्स ७ ते ८ मिनिटांचा होणार होता. यानंतर शेवटी ‘जब हॅरी मेट सेजल’चं गाणं होतं. आता मला विचार पडला…शाहरुख सरांबरोबर पुन्हा हे सगळं बोलण्यासाठी मी कसा जाऊ? यावर इपी पुढे म्हणाला, ‘बघ काय बोलतात नाहीतर पहिलं एकच गाणं ठेवूयात.”

“यानंतर मी पुन्हा शाहरुख सरांच्या व्हॅनिटीमध्ये गेलो आणि म्हणालो, सर एक विनंती आहे…मी मगाशी तुम्हाला एका गाण्यावर एन्ट्रीचं बोललो होतो…यामध्ये आम्ही थोडी गाणी वाढवतोय. आता ही सगळी सदाबहार गाणी असल्याने लोकही खूश होतील…संपूर्ण परफॉर्मन्स सात-आठ मिनिटांपर्यंत जातोय पण, तुम्ही म्हणत असाल तर मी कमी करतो. तर, ते समोरून बोलले, ‘पुरा साँग करेंगे…तुमच्याकडे कोरिओग्राफर आहे ना? तो जे सांगणार ते मी करणार. फक्त माझं लिप्सिंक चुकलं तर मला माफ करा.’ तुम्हाला आजही खरं वाटणार नाही पण…शाहरुख सर, मध्यरात्री पावणे एक वाजता सेटवर आले…त्यांनी त्या सगळ्या गाण्यांवर रात्री एक वाजता डान्स केला. आवडलं नाहीतर रिटेक करा असंही मला सांगितलं होतं. त्यानंतर पुढचा संपूर्ण शो त्यांनी एन्जॉय केला.”

“शाहरुख सरांनी मला ते तीन वाजता निघतील असं सांगितलं होतं. पण, प्रत्यक्षात ते पहाटे ५:३० वाजता घरी गेले. एकंदर शाहरुख सर आणि अनुष्का दोघंही त्या एपिसोडमध्ये पूर्णपणे रमले होते.” असं निलेश साबळेने सांगितलं.