शैलेश लोढा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचले. यामध्ये तारक मेहता ही भूमिका साकारत त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांच्या मनात कायमचं घर केलं त्यामुळे आता मालिकेत काम करत नसतानाही त्यांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. शैलेश लोढा नेहमी कुठल्या न कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात. अशातच आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या लेकीच्या लग्नामुळे.

शैलेश लोढा यांच्या लेकीचं स्वराचं नुकतच लग्न झालं आहे. लाईमलाईटपासून दूर असलेल्या त्यांच्या लेकीच्या लग्नातील व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचं कारण म्हणजे शैलेश लोढा यांनी लेकीच्या लग्नात केलेला डान्स आणि गायन. शैलेश लोढा अभिनयासह कविता करतात, गायन करतात आणि शायरीही करतात. अशातच आता लेकीच्या लग्नातही त्यांनी खूप मजा केल्याचं दिसतं.

मुंबईत पार पडलं शैलेश लोढांच्या लेकीचं लग्न

शैलेश लोढा यांच्या लेकीचं स्वराचं लग्न अत्यंत खासगी पद्धतीने पार पडलं असून, आता त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वराच्या लग्नसोहळ्यात गायक कैफी आणि हमजा शबरी यांनी आपल्या सादरीकरणाने रंगत आणली. त्यांनी या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा विवाह सोहळा मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पार पडला.

शैलेश लोठा यांच्या लेकीच्या लग्नातील हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी शैलेश लोढा यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल (दिलीप जोशी) लग्नाला उपस्थित होते का, असा प्रश्न विचारण्यात आला.

काय करते शैलेश लोढांची मुलगी?

शैलेश लोढा यांची लेक स्वराबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनय आणि मनोरंजनविश्वापासून दूर आहे पण, माध्यमांच्या वृत्तांनुसार ती एक लेखिका आहे. तिने तिची आई डॉ. स्वाती लोढा यांच्याबरोबर 54 Reasons Why Parents Suck हे पुस्तकही लिहिलं आहे.

शैलेश लोढांनी सांगितलेलं ‘तारक मेहता…’ सोडण्यामागचं कारण

शैलेश लोढा यांनी १४ वर्षे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये काम केल्यानंतर २०२२मध्ये या मालिकेतून निरोप घेतला. त्यानंतर ते अनेकदा चर्चेचा विषय ठरले. त्यांच्यानंतर अभिनेता सचिन श्रॉफ या मालिकेत तारक मेहता हे पात्र साकारत आहे. लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं होतं. दरम्यान, मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं की तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं होतं आणि ते दुसऱ्या शोचा भाग होत आहेत हे कळल्यानंतर त्यांचा सगळ्यांसमोर अपमानही केला होता.