Umaid Bhawan Palace Jodhpur: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेते शैलेश लोढा यांची मुलगी स्वरा लोढा हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. तिने ६ जुलै रोजी बँकर असलेल्या शाश्वतबरोबर लग्नगाठ बांधली. या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. स्वरा आणि शाश्वतच्या या विवाहसोहळ्याला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, बॉलीवूड अभिनेता विकी कौशल यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. हा भव्य विवाहसोहळा जोधपूरमधील अत्यंत आलिशान अशा ‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये पार पडला.
प्रियांका चोप्रानेही ‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये केलं होतं लग्न
स्वरा आणि शाश्वतचा हा विवाह सोहळा दोन ठिकाणी पार पडला. आधी मुंबईतील ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एक खासगी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर राजस्थानच्या ‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये तीन दिवस चाललेल्या शाही सोहळ्यात दोघांनी पारंपरिक रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधली. विशेष गोष्ट म्हणजे, याच पॅलेसमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचाही शाही विवाहसोहळा पार पडला होता.
उम्मेद भवन पॅलेसमध्ये एका रात्रीचं भाडं किती?
उम्मेद भवन पॅलेस ही राजस्थानमधील आलिशान व महागडी प्रॉपर्टी आहे. उम्मेद भवनमध्ये राहण्याचा विचार तुम्ही करत असाल तर त्यासाठी बराच खर्च येईल. ‘आजतक’च्या रिपोर्टनुसार, उम्मेद भवन पॅलेसमध्ये एका ‘डीलक्स रूम’चं एका रात्रीचं भाडं साधारण ४२,६०० रुपये आहे. तर दुसरीकडे, येथील सर्वात आलिशान अशा ‘महारानी सुइट’मध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी ८ लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करावे लागू शकतात. अर्थात, वेगवेगळ्या खोल्या आणि सुइट्सचं भाडं तिथल्या सोयी-सुविधांनुसार बदलू शकते.
पॅलेसमध्ये मिळणाऱ्या आलिशान सुविधा
‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये पाहुण्यांसाठी अनेक जागतिक दर्जाच्या आणि लग्झरी सुविधा उपलब्ध आहेत. इथे भव्य खोल्या आणि सुइट्स व्यतिरिक्त एक फॅमिली म्युझियम, बँक्वेट हॉल, लायब्ररी, बॉलरूम, इनडोअर स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, मार्बल स्क्वॅश कोर्ट, स्पा, फिटनेस सेंटर आणि उत्तम जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे.
उम्मेद भवन पॅलेसमध्ये २०० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करायचं असेल, तर केवळ पाहुण्यांच्या राहण्याचा खर्चच ६० ते ७० लाख रुपयांच्या घरात जाऊ शकतो. तसेच, जर प्रीमियम सुइट्स बुक केले तर हा खर्च आणखी वाढतो. जेवणाबाबत बोलायचं झाल्यास, लंच आणि डिनरवर सुमारे १६ ते २२ लाख रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो.
शाही लग्नासाठी उम्मेद भवनमध्ये किती खर्च येणार?
लग्नाचा मंडप आणि वेन्यूची सजावट, फुलांचे डेकोरेशन, लायटिंग, साऊंड, डीजे, फोटोग्राफी, मेकअप, मेहंदी, लोक कलाकार आणि वाहतूक व्यवस्था यांसारख्या गोष्टींचा खर्च स्वतंत्रपणे करावा लागतो. हा सर्व खर्च धरून उम्मेद भवन पॅलेसमध्ये एका शाही लग्नाचे एकूण बजेट साधारण १ कोटी ते ३.५ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.
