‘शक्तिमान’ मालिकेत गीता विश्वास ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवतेय? या अभिनेत्रीचं खरं नाव आहे वैष्णवी मॅकडोनाल्ड. १९९७ ते २००५ दरम्यान प्रसारित झालेल्या शक्तिमानमध्ये निर्भय पत्रकाराची भूमिका वैष्णवीने केली. टीव्हीवर इतकी यशस्वी भूमिका साकारण्यापूर्वी वैष्णवीने चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण तिला खूप वाईट अनुभव आले. इतकंच नाही तर तिचं बालपण संघर्षाने भरलेलं राहिलं. एक वेळ तर अशी आली होती की वैष्णवीच्या आईने तिचा खून करून आत्महत्या करण्याचाही विचार केला होता.

वैष्णवीच्या आई-वडिलांची खूप भांडणं व्हायची. याचा परिणाम तिच्या शिक्षणावर झाला. “आई आणि बाबांमध्ये भांडणे होत असल्याने आम्ही हॉटेलमध्ये राहत होतो. आम्ही एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचो. मी शाळेत कशी जाऊ शकेन?” असं वैष्णवी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. वैष्णवी चौथी ते १० वी शाळेत जाऊ शकली नव्हती. पण ती अभ्यासात खूप हुशार होती.

वैष्णवी मॅकडोनाल्डच्या वडिलांनी घर सोडलं

“मला शास्त्रज्ञ व्हायचं होतं, अभिनेत्री नाही,” असं वैष्णवी सांगते. पण नियतीच्या मनात तिच्यासाठी वेगळ्याच योजना होत्या. वैष्णवीचे कुटुंब हैदराबादबाहेर एका भाड्याने घेतलेल्या घरात राहायला गेले. काही दिवस आयुष्य स्थिरावल्यासारखं वाटलं. पण एकेदिवशी अचानक तिचे वडील काहीच न सांगता गायब झाले. “१४ व्या वर्षी मी देवाशी बोलू लागले. त्याला आमच्या अडचणी दिसत नाही का, असं मी विचारू लागले. दोन-तीन महिन्यांतच माझे वडील गायब झाले. आम्हा ते सापडलेच नाही,” असं वैष्णवी मॅकडोनाल्डने सांगितलं.

मुंबईत आल्यावर हताश झालेली आई जीव देणार होती

जवळ पैसे नव्हते आणि मदतीला कोणीही नव्हतं, त्यामुळे वैष्णवीच्या आईने कर्ज काढलं. ती दोन्ही मुलींना घेऊन मुंबईत आली. तिघीही तिच्या वडिलांचा शोध घेऊ लागल्या. या काळात त्या लॉजमध्ये राहत होत्या. जवळचे पैसे संपले. भाडं भरायला, जेवायलाही पैसे नव्हते. शेवटी वैष्णवीची आई हताश झाली आणि तिने दोन्ही मुलींसह स्वतःचे आयुष्य संपवायचं ठरवलं होतं. वैष्णवीला बऱ्याच वर्षांनी आईने ही गोष्ट सांगितली होती. “माझ्या आईने आत्महत्येचा आणि आम्हालाही मारून टाकण्याचा विचार केला होता. ती म्हणाली ‘मी तुम्हाला काहीतरी विषारी खायला देणार होते.’ तेव्हा मी १६ वर्षांची होते आणि माझी बहीण १२ वर्षांची होती. आमच्याबरोबर चुकीचं काही होऊ नये म्हणून तिने हा टोकाचा विचार केला होता,” असं वैष्णवी मॅकडोनाल्ड म्हणाली.

वैष्णवीला आला दैवी अनुभव

वैष्णवीची आई हताश होऊन तिला व तिच्या बहिणीला घेऊन जवळच्या एका चर्चमध्ये गेली. तिथेच तिचे आयुष्य कायमचे बदलले, असं वैष्णवीला वाटतं. “मला एक दैवी अनुभव आला. मला ईश्वराची शक्ती जाणवली आणि मी रडू लागले.” परत लॉजवर आल्यावर त्यांना दरवाजाबाहेर १०० रुपयांच्या नवीन नोटांचे एक बंडल सापडले. जेवढी रक्कम बिल भरण्यासाठी हवी होती, तेवढेच ते पैसे होते. “त्या दिवसापासून माझा देवावर विश्वास बसला. दोन आठवड्यांच्या आतच आम्ही एका 1-BHK फ्लॅटमध्ये राहायला गेलो. हे सर्व एका चमत्कारासारखं होतं,” असं वैष्णवी मॅकडोनाल्ड सांगते.

यानंतर दोन वर्षांनी वैष्णवी तिच्या वडिलांना भेटली. त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि धर्मांतरही केलं होतं. त्यांनी सोडून जाण्याचं कारणही सांगितलं. यानंतर वैष्णवीने त्यांना माफ करायचं ठरवलं. त्यांच्या शेवटच्या क्षणात ती त्यांच्याबरोबर होती.

वैष्णवीचा अभिनयातील प्रवास

वैष्णवीला बालकलाकार म्हणून रामसे ब्रदर्सच्या वीरानामध्ये काम करायची संधी मिळाली. या हॉरर चित्रपटात तिने ‘जास्मिन’ या भूताने पछाडलेल्या मुख्य भूमिकेच्या बालपणीचा रोल केला होता. या सिनेमात काम केल्यानंतर वैष्णवी रात्री उठून चालायला लागायची. ती जागी असायची पण तरी चालत जायची. जवळपास महिनाभर ती या अवस्थेत होती.

गरजेपोटी प्रौढ भूमिका साकारल्या

वैष्णवीने गरजेपोटी तिने प्रौढ भूमिका साकारल्या. शिक्षण परवडणारं नसल्याने काम करावं लागलं. पुढे तिला चित्रपटांच्या ऑफर आल्या. “मला चार चित्रपट मिळाले. त्यापैकी एकही पूर्ण झाला नाही आणि सर्व रखडलं. पण मला पैसे मिळाले, ज्यामुळे आम्हाला मदत झाली आणि माझा प्रवास अशा प्रकारे सुरू झाला,” असं वैष्णवी मॅकडोनाल्डने नमूद केलं.

हिरो व दिग्दर्शक वाईट बोलायचे

‘लाडला’ सिनेमातून वैष्णवीच्या कामाने लक्ष वेधून घेतलं. नंतर वैष्णवीला एका मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्यात आलं. पण हिरो व दिग्दर्शकाने तिला फक्त पुरुष असलेल्या एका इव्हेंटला संध्याकाळी एकटं यायला सांगितलं. “माझी आई नेहमीच माझ्याबरोबर असायची आणि त्यामुळे त्यांना आवडायचं नाही.” एकदा आईशिवाय स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगला येणार नसल्याचं म्हणताच तिला सिनेमातून काढून टाकण्यात आलं. हिरो व दिग्दर्शक वैष्णवीबद्दल वाईट बोलायचे आणि ते ऐकून तिची आई रडायची.

…अन् वैष्णवीने फिल्म इंडस्ट्री सोडली

वैष्णवी सिनेसृष्टीतील विषारीपणाला कंटाळली होती. मग वैष्णवीने एक मोठा निर्णय घेतला. पण यामुळे तिचं करिअर संपेल, अशी भीती तिच्या आईला होती. वैष्णवी टीव्हीवर आली. वैष्णवीने मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तिमान’ (१९९८) मध्ये गीता विश्वासची भूमिका करण्यास होकार दिला. यामुळे वैष्णवी मॅकडोनाल्डला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

वैष्णवीच्या गाजलेल्या मालिका

छोट्या पडद्यावरच वैष्णवीला खऱ्या अर्थाने यश मिळालं. नंतर तिने मिले जब हम तुम सारख्या मालिकेपासून ते सपने सुहाने लडकपन के सारख्या कौटुंबिक मालिकांमध्ये काम केलं. टशन-ए-इश्क, क्यूं उठे दिल छोड आये आणि मीत सारख्या मालिकांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या.