Shalaka Pawar on Sameer Choughule: ‘मर्डर मेस्त्री, ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण, इरादा पक्का, गोठ, तू चांदणे शिंपीत जाशी, का रे दुरावा अशा अनेक चित्रपट व मालिकांमधून अभिनेत्री शलाका पवारने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेत्रीने नाटकांतही काम केले आहे.
“किशोरी अंबिये ही खूप…”
शलाका पवारने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली, “आमच्या यदा कदाचित या नाटकातील जे कलाकार आहेत, ते आम्ही सगळे एकमेकांच्या खूप संपर्कात नसतो; पण आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा तेव्हा आमच्यातील जिव्हाळा तसाच असल्याचे जाणवते. राकेश जाधव, पौर्णिमा अहिरे, सीमा रेणके या सर्वांबद्दल जिव्हाळा वाटतो. समीर चौगुले माझा चांगला मित्र होता आणि आज आम्ही तितके संपर्कात नसलो तरी आम्हाला एकमेकांबद्दल जिव्हाळा आहे. किशोरी अंबिये ही खूप सीनियर आहे; पण तिनं मला इतकं प्रेम दिलं आहे. ती माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखीच आहे. माझी नणंद असल्यासारखी मी तिला वागवते. त्याबरोबरच सागर कारंडे, त्याची बायको तेसुद्धा माझे जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत. नाटकाचं कसं असतं की, कमी माणसं असतात. त्यामुळे ती कुटुंबासारखी होतात.”
“तो मला माणूस म्हणून खूप…”
या मुलाखतीत तिला विचारले की, ‘फू बाई फू’मध्ये तुझी व समीर चौगुलेंची जोडी होती. आता त्यांना हास्यजत्रेत पाहताना काय भावना असतात? जुन्या आठवणी आठवतात का? त्यावर शलाका म्हणाली, “संतोषबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यानं खूप काम केलं आहे. मी त्याच्याबरोबर ‘यदा कदाचित’पासून आहे. त्याच्याही आधीपासून संतोष आणि तो एकमेकांबरोबर काम करायचे. माझा तो सहकलाकार होता. तो मला माणूस म्हणून खूप आवडतो. त्याची बायको कविताबरोबर माझी चांगली मैत्री आहे.”
पुढे समीर चौगुलेंबद्दल अभिनेत्री म्हणाली, “आज तो एवढा मोठा कलाकार झाला आहे. तो स्वत:चं एकपात्री करतो, तेसुद्धा खूप चांगलं चाललंय आणि परदेशात लोक त्याच्यावर फिदा असतात. माझे नातेवाईक म्हणतात की, समीर तो तुझ्याकडे यायचा, तो आता किती मोठा झाला आहे. त्याचं कौतुक वाटतं. मला स्वत:ला त्याचं वलय बघून खूप बरं वाटतं. माझ्यासाठी तो आहे तसाच आहे.”
“माझ्यामुळे त्याचं नुकसान झालं”
‘फू बाई फू’बद्दल अभिनेत्री म्हणाली, “मी त्यावेळी समीरला खूप हैराण करायचे. मला स्पर्धा फार माहीत नव्हती. तिथे बऱ्यापैकी सगळं स्पर्धात्मक वातावरण होतं. मी मला येत नाही, असं म्हणत गळपटूनच जायचे; पण समीर मला प्रोत्साहन द्यायचा. एक दिवस आम्ही स्पर्धेतूनच बाहेर झालो. तेव्हा माझ्यामुळे त्याचं नुकसान झालं. तेव्हा मला वाईट वाटलं होतं. मी त्याची पार्टनर नसते, दुसरं कोणी असतं, तर बरं झालं असतं. तो मला म्हणायचा की, असं काही नाही. तू छान केलंस. कविताही समजावायची. पण, मला माहीत होतं की, त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. त्यानं आधी स्पर्धांमध्ये भाग घेतला असल्यामुळे त्याच्यात जिद्द आहे. त्याला ते करायचं होतं. माझा आणि त्याचा स्वभाव भिन्न आहे. मी तितकी स्पर्धा करणारी व्यक्ती नाही. त्यामुळे मला खूप बरं वाटतं की, त्याला एक छान माध्यम मिळालं, ज्यामध्ये त्याचं टॅलेंट दिसलं. लोकांनी त्याला प्रचंड उचलून धरलं.”
दरम्यान, अभिनेत्रीने याच मुलाखतीत ‘फू बाई फू’चे आणखी काही किस्सेही सांगितले.
