Shantanu Moghe Talks About Mental Health : शंतनू मोघे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनं आतापर्यंत अनेक कलाकृतींमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. नाटक, मालिका, सीरिज आणि चित्रपट अशा विविध माध्यमात त्यांनं काम केलं आहे. परंतु, तो खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आला ते ‘झी मराठी’वरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेमुळे. यामध्ये त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली. यासाठी त्याचं नेहमी कौतुक होत असतं.
शंतनू मोघे सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘मोहिनी’ या मालिकेतून झळकत आहे. यामध्ये तो स्टंट मॅनच्या भूमिकेत आहे. अशातच आता त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सध्या तो काय करत आहे, तसंच तो त्याच्या फिटनेसची, मानसिक आरोग्याची काळजी कशी घेतो याबद्दल सांगितलं आहे.
शारीरिक स्वस्थाप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणंसुद्धा महत्त्वाचं असतं. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात तर अनेकांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक जण तनावातून जात असतात. यामुळेच हल्ली मानसिक आरोग्याविषयीची जागृकता अधिक वाढली आहे. अशातच आता शंतनू मोघेनंसुद्धा तो त्याच्या मानसिक आरोग्यासाठी काय करतो याबद्दल सांगितलं आहे.
मानसिक आरोग्याची कशी काळजी घेतो शंतनू?
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत शंतनूला इतकं सकारात्मक राहण्यासाठी मानसिक आरोग्याची कशी काळजी घेतो, काही विशेष गोष्टी करतो का? असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो. मी दररोज ओमची साधना करतो. मी दररोज प्राणायाम करतो. कधी कधी शूटिंगमुळे जमत नाही. पण, जमेल तसं करतोच. मी उत्तम पुस्तकं वाचतो. झोपण्याआधी थोडं वाचतो. मी भरपूर खातो. त्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी हे सगळं करतो.पण, मला चांगले मित्र आणि उत्तम कुटुंबीय मिळाल्यानं मानसिक आरोग्यासाठी फार काही करावं लागत नाही आणि मी व्यायाम करतो, स्विमिंग करतो.”
पुढे त्याला देवावर विश्वास आहे का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो आहे. मी देवाचं खूप काही करतो असं नाहीये. पण, माझा देवावर १०० टक्के विश्वास आहे. तुम्ही देव म्हणा, नशीब म्हणा किंवा दुसरं काही म्हणा पण एक शक्ती नक्कीच आहे. जी तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी मदत करते. पण, त्यासाठी तुम्हाला स्वत:ला समर्पित करावं लागतं.”
दरम्यान, ऑगस्ट २०१५मध्ये शंतनूची बायको आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं. त्यामुळे मधला काळ शंतनूसाठी मानसिक आणि सगळ्याच बाजूनं कठीण होता. पण, त्यानंतर लगेचच त्यांनं कामाला सुरुवात केली. आता तो नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेत
