मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. प्रिया अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. या आजारपणाच्या काळात तिला पती शंतनू मोघेने खंबीरपणे साथ दिली. यादरम्यान, प्रियाने मालिकाविश्वातून सुद्धा ब्रेक घेतला होता आणि पत्नीची काळजी घेता यावी यासाठी शंतनू सुद्धा मध्यंतरी काही महिने कलाविश्वापासून दूर होता.

आता शंतनूने पुन्हा एकदा मालिकाविश्वात सक्रिय झाला आहे. मध्यंतरी तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर, सध्या शंतनूची एन्ट्री कलर्स मराठीच्या ‘मोहिनी’ या नव्या मालिकेत झालेली आहे.

प्रियाबद्दल सांगताना शंतनू ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “आयुष्य हे पुढे जात राहतं…जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. खरंतर, त्या कठीण काळाचा तिने खूप धैर्याने सामना केला. पण, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या आजारपणाच्या लढाईत आम्ही हरलो.”

Award Banner

“प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं…प्रत्येकाची जडणघडण वेगवेगळ्या प्रकारे होत असते. शेवटी आपलं आपल्याकडे…इतकंच मी म्हणेन. प्रियाला जी मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, ते काम खूप आवडलं होतं. सुरुवातीला आम्ही दोघांनी ‘या सुखांनो या’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. पण, त्यामध्ये आमचे एकत्र सीन्स नव्हते. त्यानंतर मी एक ‘सफरचंद’ नावाचं नाटक केलं होतं, ते काम सुद्धा तिला खूप आवडलं होतं.” असं शंतनूने सांगितलं.

प्रिया मराठे व शंतनू मोघे यांची ओळख कशी झाली होती?

दरम्यान, प्रिया आणि शंतनूची ओळख अभिनेत्री शर्वरी लोहकरेमुळे झाली होती. प्रिया मूळची ठाण्याची होती. शूटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे. तिची रूममेट अभिनेत्री शर्वरी लोहकरेमुळे प्रियाची शंतनूबरोबर ओळख झाली. शर्वरी आणि शंतनू त्यावेळी ‘आई’ मालिकेत एकत्र काम करीत होते. हळूहळू फोन, मेसेजेस सुरू झाले. दीड वर्षे डेट केल्यानंतर शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं. चांदण्याच्या प्रकाशात गुडघ्यांवर बसत शंतनूने प्रियाला प्रपोज केलं होतं.

दोघांच्या या नात्याबद्दल घरच्यांना काहीच कल्पना नव्हती; मात्र एका पुरस्कार सोहळ्यात शंतनूने स्टेजवरच प्रियाचं नाव घेतलं आणि ही गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचली. पुढे दोघांच्या कुटुंबीयांनी सुद्धा या नात्याला होकार दिला आणि २४ एप्रिल २०१२ मध्ये या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं होतं.