Marathi Actress SharayuSonawane rescues a dog in Pune : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे प्राणीप्रेमी आहेत आणि त्यांच्याकडे पेट्स आहेत. जे अनेकदा सोशल मीडियावरुन प्राण्यांबद्दलचे व्हिडीओ शेअर करत जागृक्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच आता मराठी मालिकाविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री शरयू सोनावणे हिनेसुद्धा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानंतर अनेक कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे.
शरयू सोनावणे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने एका श्वानाचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे आणि फक्त हा व्हिडीओ शेअर नाही केला तर तिने त्या ‘श्वानाचा जीवसुद्धा वाचवला आहे. अभिनेत्रीच्या या कृतीचं अनेक कलाकारांनी कौतुक केलं आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
शरयूने सांगितलं पूर्ण प्रकरण
शरयूने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एका श्वानाचे प्लास्टिकच्या बरणीत तोंड अडकल्याचे दिसते. ज्यामधून बाहेर येण्यासाठी तो संघर्ष करत असतो. तिने याबद्दलची पूर्ण माहिती कॅप्शनमधून दिली आहे. अभिनेत्री म्हणाली, “पुणे सिंहगड रोड नांदेड सिटी येथे आज सकाळी साधारण ८ वाजता मला ‘रस्त्यावर एक श्वान दिसला ज्याचे तोंड एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये अडकलेले होते. तो मदतीच्या शोधात इकडे-तिकडे पळत होता. गेले जवळपास ३ दिवस तो अन्न-पाणी आणि श्वासासाठी संघर्ष करत होता. खूप लोकांनी त्याला पाहिले, पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “आपल्याला थेट मदत करता आली नाही तरी एनजीओला फोन करून अशा मुक्या प्राण्यांची मदत करू शकतो. सुदैवाने @hart_pune @swapnilambep यांनी एका फोनवर येऊन सुमारे ४-५ तासांच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू करून त्याला सुरक्षित बाहेर काढले. माझी सर्वांना विनंती आहे प्लास्टिकची बरणी, काच किंवा कचरा उघड्यावर फेकू नका. भुकेमुळे किंवा तहानेमुळे प्राणी अशा वस्तूंमध्ये तोंड घालतात आणि अडकतात. त्यांना समज नसते, पण आपल्याला आहे. आपल्या थोड्या जबाबदारीमुळे एखाद्या मुक्या जीवाचा जीव वाचू शकतो.”
शरयूने केलेल्या या कृतीचं मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे. शर्मिला शिंदे, राज मोरे, ऋतुजा कुलकर्णी, प्राप्ती रेडकर या मंडळींनी कमेंट करत तिच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.
