गेल्यावेळेप्रमाणेच यावर्षीसुद्धा ‘शार्क टँक इंडिया’चा दूसरा सीझन चांगलाच गाजला. यावेळी अशनीर ग्रोव्हर आणि त्याचे धमाल सल्ले नसूनही हा नवा सीझनही तितकाच मनोरंजक झाला. या कार्यक्रमामुळे यातील परीक्षक म्हणून भूमिका बजावणाऱ्या शार्क्सच्या आयुष्यातही बरेच बदल झाले. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. याच शोचा एक लोकप्रिय असा शार्क अनुपम मित्तल सध्या चर्चेत आहे.

अनुपम हे शादी.कॉम आणि इतर काही बड्या कंपनीचे सीइओ आहेत. अनुपम सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील अपडेट ते त्यांच्या चाहत्यांना देत असतात. नुकतंच अनुमप यांनी त्यांच्या हाताला झालेल्या गंभीर दुखापतीविषयी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

आणखी वाचा : Video : सिद्धार्थ जाधवकडून अशोक सराफ यांना अनोखी मानवंदना; केलं असं काही की सगळ्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

अनुपम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. ते रुग्णालयातील बेडवर आराम करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिलं, “जेव्हा तुमचं ध्येय तुमच्यापासून आणखी लांब जातं तेव्हा आणखी जास्त मेहनत करा. गेली बरीच वर्षं शरीरावर मेहनत घेत आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागता आणि ती तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ असता तेव्हा नियती किंवा आयुष्य तुम्हाला पुन्हा आहे त्या जागी आणून ठेवतं. अपयशाच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही, फक्त पुन्हा नव्या उमेदीसह उभं राहणंच आपल्या हातात असतं.”

अनुपम मित्तल यांची हि पोस्ट पाहून चाहते त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. अनुपम ‘शादी.कॉम’सह ‘मकान.कॉम’, ‘मौज मोबाईल’ अशा विविध कंपन्यांचे सर्वेसर्वा आहेत. याबरोबरच इतरही वेगवेगळ्या उद्योगात अनुपम यांनी शार्क टँकच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली आहे. ‘शार्क टँक इंडिया’मुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. इंस्टाग्रामवर त्यांचे १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.