Sharmishtha Raut Daughter Runji : शर्मिष्ठा राऊत तिच्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेते. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेत्री लोकप्रिय मालिकांची निर्माती म्हणून देखील जबाबदारी सांभाळताना दिसतेय. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, २०२५ मध्ये शर्मिष्ठाला मुलगी झाली. गेल्यावर्षी गणेशोत्सवात बाप्पाचं आणि गौरीचं आगमन झाल्यावर शर्मिष्ठाने लेकीची पहिली झलक माध्यमांना दाखवली होती.
आता नुकतीच शर्मिष्ठा आपल्या लाडक्या लेकीसह एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी पोहोचली होती. महत्त्वाचं म्हणजे याच अभिनेत्रीच्या मुलीच्या नावावरून शर्मिष्ठाने तिच्या लेकीचं नाव ‘रुंजी’ ठेवलंय. म्हणूनच या फोटोंना तिने “When रुंजी Meets रुंजी” असं कॅप्शन दिलं आहे.
शर्मिष्ठा, तिचा पती तेजस आणि चिमुकली रुंजी हे तिघंही नुकतेच अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या घरी पोहोचले होते. याचे खास फोटो शर्मिष्ठाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रतीक्षा यांच्या मुलीचं नाव सुद्धा रुंजी आहे.
शर्मिष्ठाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत लेकीचं नाव रुंजी का ठेवलं? यामागचं कारण सांगितलं होतं. अभिनेत्री सांगते, “रुंजी म्हणजे अकस्मात सुंदर…मी आणि प्रतीक्षा ताई ( प्रतीक्षा लोणकर ) ‘अबोली’ नावाची मालिका करत होतो. मी ताईला सहज विचारलं होतं की, तुझ्या मुलीचं नाव काय आहे? तर ती मला म्हणाली, ‘रुंजी.’ मला हे नाव फारच आवडलं होतं. त्यावेळी मी तिला म्हटलं होतं, मला जर मुलगी झाली तर हे नाव मी चोरणार आहे. मग ती म्हणाली, म्हणजे काय…तू नक्की हेच नाव ठेव.”
याशिवाय शर्मिष्ठाचा पती तेजसला सुद्धा हे नाव खूपच आवडलं होतं. अभिनेत्री पुढे म्हणाली, “नंतर आम्हाला मुलगी झाल्यावर नाव शोधण्याच्या प्रोसेसमध्ये मी तेजसला ‘अबोली’चा तो किस्सा सांगितला. तेव्हा तो मला म्हणाला, त्यालाही हे नाव आवडलं आहे. तेच ठेऊयात.” म्हणूनच या दोघांनी लाडक्या लेकीचं नाव रुंजी असं ठेवलं आहे.
दरम्यान, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचं लग्न लॉकडाऊनदम्यान ऑक्टोबर २०२० मध्ये झालं. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा झाले आहेत.
