अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने गेल्या काही वर्षांत टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे. सध्या शर्मिष्ठा व तेजस यांच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेली ‘तारिणी’ मालिका झी मराठीवर रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जात आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘तारिणी’ टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा बाजी मारतेय. अन्यायाविरोधात आवाज उठवणं, नेहमी सत्याची बाजू घेणं असे तारिणीचे बरेच गुण प्रेक्षकांना भावतात. आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडून तारिणीचं घरातही तेवढंच छान लक्ष असतं. तारिणी सर्वांसाठीच आदर्श ठरतेय.
त्यामुळे एका दाम्पत्याने त्यांच्या चिमुकल्या लेकीचं नाव तारिणी ठेवलंय. याचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ शर्मिष्ठापर्यंत पोहोचताच तिने खास पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
शर्मिष्ठा राऊत म्हणते, “आज माझ्यासाठी, तेजससाठी आणि आमच्या प्रोडक्शन हाऊससाठी खूप आनंदाचा क्षण आहे. निर्माते म्हणून जेव्हा प्रत्येकवेळी आम्ही विविध कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येतो…तेव्हा त्या कलाकृतीच्या यशाचं श्रेय हे केवळ आमचं नसून संपूर्ण टीमचं असतं. चॅनेल, दिग्दर्शक, लेखक, चॅनेलची टीम, तांत्रिक बाजू सांभाळणारी टीम या सगळ्यांचं हे श्रेय असतं. पण, हे सगळं सुरू असताना…आमच्या कलाकृतीमधील एखादं पात्रं जेव्हा कोणाच्या तरी आयुष्याचा, स्वप्नांचा भाग होतं, तेव्हा ती कथा आणि पात्रं खूप मोठी होतात. यासारखं दुसरं यश नाहीये. हेमंत व दिपाली पाटील यांनी त्यांच्या चिमुकलीचं नाव तारिणी ठेवलंय. हे ऐकून मला खूप जास्त भारी वाटलं. अंगावर अगदी शहारा आला…आमची मालिका लोकांपर्यंत फक्त पोहोचत नाहीये तर लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग देखील होते. मी या दाम्पत्याला शुभेच्छा देते…तुमची तारिणी सुद्धा आमच्या तारिणीप्रमाणे धैर्यवान होऊदेत, खंबीर आणि खूप प्रेमळ असूदेत.”
शर्मिष्ठाची चिमुकल्या तारिणी बाळासाठी खास पोस्ट
प्रिय तारिणी,
एक निर्माती म्हणून, तू मला आज माझ्या कामाची पोचपावती दिलीस… कथेतील एखादं पात्र कुणाच्या तरी आयुष्याचा, विचारांचा भाग झालंय हे पाहून गहिवरून आलंय गं. आज लक्ष्मीसह आपल्या घरी दुर्गाही यावी, अशी इच्छा बाळगणारे तुझ्या आईबाबांसारखे पालक पाहिले की मन खरंच भरून येतं.
तू सुद्धा मालिकेतील तारिणीप्रमाणे निडर, धैर्यवान आणि स्वतःच्या ध्येयासाठी खंबीरपणे उभी राहणारी होवो हा आशीर्वाद आणि मनापासून शुभेच्छा! तुझीच शर्मिष्ठा मावशी टीममधील सर्व कलाकारांचे खूप खूप आभार आणि खूप कौतुक..तुमच्या मेहनतीशिवाय हे अपूर्ण आहे!
दरम्यान, शर्मिष्ठाच्या या व्हिडीओवर कमेंट करत या चिमुकलीचे आई-बाबा हेमंत व दिपाली पाटील म्हणतात, “आदरणीय शर्मिष्ठा राऊत मॅडम, मनःपूर्वक धन्यवाद! आमच्या चिमुकलीचं नाव ‘तारिणी’ ठेवण्यामागे तारिणी मालिकेची प्रेरणा आहे. आमच्या मुलीचं नाव ऐकून तुम्हाला आनंद झाला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या आनंदामुळे आम्हालाही आमच्या छोट्या तारिणीचा आणखी अभिमान वाटतोय. तुमच्यासारख्या व्यक्तीकडून मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी आयुष्यभराची आठवण राहील. इतकी सुंदर आणि प्रेरणादायी मालिका प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आमच्या लहानग्या तारिणीला तुमचे आशीर्वाद नेहमी लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
दरम्यान, ‘तारिणी’ मालिका दररोज रात्री ९:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.
