सोशल मीडियावरील अनेक सामाजिक किंवा राजकीय विषयांवरील व्हिडीओमुळे चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर तसंच विविध समस्यांबद्दल आपली मांडताना दिसतो. मग ते रस्त्यावरील कचऱ्यासंदर्भात काही असो किंवा मग रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल काही असो. शशांक कायम अशा अनेक घटनांचे व्हिडीओ शेअर करत त्याची प्रतिक्रिया व्यक्त करतो.
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकदा प्रशासनाकडून दखलही घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच शशांकने नुकतंच त्याच्या परिसरातील एक घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ठाण्यामध्ये ज्या सोसायटीत शशांक राहतो, त्या सोसायटीसमोर एका माणसाने चुकीच्या पद्धतीने गाडी पार्किंग केल्याबद्दल त्याने व्हिडीओद्वारे संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडीओमध्ये शशांक असं म्हणतो, “भारतामध्ये माणसाचं आयुष्य आणि जगणं हे अत्यंत स्वस्त आहे आणि त्याची किंमत शून्य आहे, याची दुर्दैवाने पुन्हापुन्हा प्रचिती येते. ठाण्यातील माझ्याच सोसायटीच्या समोर एका माणसाने कमालीचं पार्किंग केलं आहे. रिकाम्या जागेत एक वेगळी गाडी उभी होती, त्यांना ती काढायची होती; म्हणून चार माणसांनी डबल पार्किंग केलेली गाडी आणखी बाहेर आणून ठेवली. आता ती पूर्ण रस्त्यावर आलेली आहे.”
यापुढे शशांकने म्हटलं, “या गाडीने रस्त्यावरची इतर जागा इतकी व्यापली आहे की, ज्यामुळे रस्त्यावरच्या लोकांना चालताना समस्या येतेय. आपल्याकडे प्रॉब्लेम हाच आहे, या गाडीला आपटून चार माणसं मेली तरी काय फरक पडत नाही. आमच्या वसंत विहारमध्ये डबल पार्किंग करतात हा विषय तर मोठा आहेच. पण डबल पार्किंग केल्यानंतर त्याच्या मागची पार्किंग केलेली गाडी ज्यांना काढायची होती; त्यांनी दुसरी गाडी अशी बाहेर आणून ठेवली ज्याचा लोकांना किती त्रास होणार आहे हे तुम्हीच बघा. आहे की नाही गंमत.”
यापुढे त्याने “खरंच आपल्याकडे जीव स्वस्त झाला आहे. मला माहित नाही ठाणे महानगरपालिकेची ही थेट जबाबदारी असते की नसते. पण त्यांना असं सांगणं आहे की, ही गाडी फक्त उचलू नका; तर स्क्रॅप करा” असं म्हटलं आहे. शिवाय या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांकने म्हटलं की, “ठिकाण- वसंत विहार ठाणे. समस्या- डबल पार्किंग. त्रास- घंटा काहीही नाही. उपाय- ४ लोक मेले की बघू” दरम्यान, शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
“अत्यंत बेजबाबदार”, “आताच्या घडीला जगण्यापेक्षा मरण खूप सोप आणि स्वस्त झालं आहे”, “या अश्या चुकांमुळे कितीतरी नाहक बळी जातात”, “लोकांना शिस्त नाही हेच खरं.. सारखं महानगरपालिकेला दोष देण्यात अर्थ नाही”, “तुझ्यासारख्या काही मोजक्याच संवेदनशील लोकांना या गोष्टींचा मनस्वी संताप येतो” अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.