Priyanka Ketkar shares special post for Shashank Ketkar: लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरचा आज (१५ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्याच्यावर चाहत्यांसह कलाकारही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता या सगळ्यात त्याच्या पत्नीने प्रियांका केतकरने लिहिलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
“पालकांना कधीही न विसरणारा मुलगा अन्…”
प्रियांका केतकरने शशांकचा एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या एका हातात मुलगा आणि दुसऱ्या हातात मुलगी असल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “काही माणसं प्रेम करण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात, पण तुला जपावंसं वाटतं.”
पुढे तिने लिहिले, “आपली मुलं ज्याच्याकडे कायम जाऊ शकतील असा प्रेमळ वडील, पालकांना कधीही न विसरणारा मुलगा आणि प्रत्येक परिस्थितीत शांतपणे माझ्या पाठीशी उभा राहणारा पती म्हणून तुला पाहताना माझं मन भरून येतं. तू ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतोस, आमच्यासाठी त्याग करतोस आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करतोस, त्याची कदाचित तुला जाणीवही नसेल; पण या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या मुलांना तुला बाबा म्हणता येतं, हे त्यांचं भाग्य आहे आणि तुला माझा पती म्हणता येतं हे मी माझं प्रत्येक दिवशी नशीब समजते. तू आपल्या कुटुंबाचं हृदय आहेस, आमची सुरक्षित जागा आहेस आणि आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आशीर्वाद आहेस; आम्हाला मिळालेला सुंदर आशीर्वाद आहेस.”
पुढे तिने शशांकला टॅग करत लिहिले, “शब्दांत व्यक्त करता येणार नाही, इतकं आमचं तुझ्यावर प्रेम आहे.” प्रियांकाची ही पोस्ट शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केली आणि प्रियांकाला टॅग करत लिहिले, “आपलं आयुष्य.”
आता प्रियांकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “किती सुंदर लिहिलं आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “किती क्यूट.” तर अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, शशांकच्या कामाबद्दल बोलायचे तर तो नुकताच ‘कमळी’ या मालिकेत दिसला होता. त्याने रितेश सरपोतदार ही भूमिका साकारली होती.
