अभिनेता शशांक केतकर(Shashank Ketkar) हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. ‘होणार सून मी या घरची’मधला श्री असो किंवा ‘स्कॅम २००३’मधील जयंत करमरकर. शशांक केतकरने त्याच्या अभिनयाने या भूमिकांना न्याय दिल्याचे म्हटले जाते. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘सोपं नसतं काही’, ‘शो टाइम’, ‘गुनाह’ अशा विविध टीव्ही मालिका व वेब सीरिजमध्ये अभिनेत्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रिशांक इज माय वर्ल्ड या फॅन पेजवर शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये शशांक केतकरला टॅग केले गेले आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची झलक पाहायला मिळत आहे. गुनाह, शो टाइम, स्कॅम २००३, सुखाच्या सरींनी मन हे बावरे अशा वेब सीरिज व मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका पाहायला मिळतात. हा व्हिडीओ शेअर करताना ‘प्रिशांक इज माय वर्ल्ड’ने शशांकने ज्या पद्धतीने प्रत्येक भूमिका साकारली आहे, त्याचे कौतुक केले आहे. या सगळ्यात अभिनेत्याने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलेल्या ओळी लक्ष वेधून घेत आहेत.

शशांक केतकर काय म्हणाला?

अभिनेत्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटला शेअर केला. त्यावर त्याने प्रिशांक इज माय वर्ल्ड या अकाउंटला टॅग करीत आभार मानले आणि पुढे लिहिले, “माझ्याकडून मागच्या १४ वर्षांत तसं बरं आणि बरंच काम झालं. इतकं करूनही शेवटी तू टीव्हीचा अ‍ॅक्टर, असं लोक सहज म्हणतात.”

या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्याला उत्तम अभिनेता म्हटले आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. एका नेटकऱ्याने, अरे शशांक, तुला टीव्ही अभिनेता म्हणतात. म्हणू दे लेका. तू टीव्हीचा यशस्वी चेहरा आहेस. विविधरंगी भूमिका करून ते तू दाखवून दिले आहेस आणि शशांक मित्रा, शाहरुख खानसुद्धा टीव्हीचा चेहरा आहे. त्यामुळे तू आमचा एसआरके, एसके म्हणजेच शशांक केतकर आहेस. खूप खूप प्रेम, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

अभिनेता आजपर्यंत अनेक मालिका व वेब सीरिजमध्ये दिसला आहे. सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही पद्धतींच्या भूमिका साकारत शशांकने प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. जितके अभिनेत्याच्या अभिनयाचे कौतुक होते, तितकाच तो त्याच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो.

दरम्यान, सध्या अभिनेता त्याच्या मुरांबा या मालिकेत प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या मालिकेत त्याने अक्षय ही भूमिका साकारली आहे. सध्या या मालिकेत ट्विस्ट आला असून, अक्षयच्या आयुष्यात चढ-उतार येताना दिसत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar expressed regret says after working 14 years in acting people easily say you are television actor nsp