Shashank Ketkar on Mrunal Dusanis Husband : मालिकाविश्वातील कलाकारांच्या ऑनस्क्रीन जोड्या घराघरांत प्रचंड लोकप्रिय होतात. अशीच एक सर्वांची लाडकी जोडी म्हणजे सिद्धार्थ आणि अनु. या भूमिका शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस यांनी ‘हे मन बावरे’ मालिकेत साकारल्या होत्या. आज ही मालिका संपून अनेक वर्षे उलटून गेली असली तरी सिद्धार्थ-अनुने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. शशांक-मृणालची या मालिकेच्या निमित्ताने ऑफस्क्रीन सुद्धा तेवढीच छान मैत्री झाली. या दोघांचे कुटुंबीय सुद्धा एकमेकांना तेवढेच छान ओळखतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शशांकने मृणालच्या नवऱ्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
शशांक केतकरने मृणालच्या नवऱ्याचं ‘दिल के करीब’ या सुलेखा तळवलकरांच्या शोमध्ये कौतुक केलं आहे. शशांक सांगतो, “नीरजने ज्याप्रकारे रेस्टॉरंट सुरू केलं…त्याचं हे धाडस मला खूप आवडलं. त्याने योग्य वयात…योग्य निर्णय घेतला. आजच्या पिढीतले तरुण कदाचित असा धाडसी निर्णय घेणार नाहीत. कारण, अमेरिकेत सगळं काही सुरळीत सुरू असताना, तिथे सेटल असताना…सगळ्या गोष्टी सोडून भारतात परत येणं. इथे येऊन रेस्टॉरंट सुरू करणं, ही खूप मोठी गोष्ट आहे.”
“खरंतर, हे नीरजचं क्षेत्र सुद्धा नाहीये. तो अमेरिकेत वेगळ्या कंपनीत कार्यरत होता. असं सगळं असताना नीरजने रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावरून प्रत्येकाला समजेल तो आपल्या कुटुंबाचा किती विचार करतोय. तो कुटुंबासाठी खूप मोठं स्वप्न बघतोय हे यातून जाणवतं.” असं सांगत शशांकने नीरजचं कौतुक केलं.
मृणालचा नवरा अमेरिकेत कुठे कार्यरत होता?
तर, नवऱ्याबद्दल मृणाल दुसानिस म्हणाली, “माझा नवरा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तो जवळपास १५ वर्षे अमेरिकेत होता, आयटीमध्ये काम करत होता. पण, त्याला पहिल्यापासूनच बिझनेस करायचा होता. विशेषत: रेस्टॉरंट वगैरे सुरू करायचं होतं. त्यामुळे तो सुद्धा योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. मग आम्ही परत यायचा निर्णय घेतल्यावर सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या. नशिबाने आमच्या रेस्टॉरंटला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळतो.”
दरम्यान, मृणाल आणि शशांक यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, मृणाल सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. तर शशांक केतकर सध्या ‘मुरांबा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
