Shashank Ketkar : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अनेक विविध माध्यामात काम केलं असलं तरी नाटकं, मालिका किंवा चित्रपट यातील एका कुठल्यातरी माध्यामात त्यांना इतर माध्यमांच्या तुलनेत अधिक यश मिळत असतं. यापैकीच एक म्हणजे शशांक केतकर. शशांकने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटकात काम केलंय पण, त्याला खरी ओळख मिळाली ते टेलिव्हिजनमुळेच.
शशांकने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, मोठ्या पडद्यावरही चांगले चित्रपट करता यावे अशीसुद्धा त्याची इच्छा आहे. मात्र एकावेळी सगळीकडे प्रयत्न करत राहण्यापेक्षा एका कुठल्या माध्यमात यश मिळत असेल तर त्याचा आनंद असणं महत्त्वाचं असतं असं त्याने नुकतच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात…
शशांकने केलं संकर्षणचं कौतुक
मुलाखतीत शशांक म्हणाला, “आपल्याकडे असे अनेक कलाकार आहेत जे नाटक, मालिका आणि चित्रपट तिन्ही माध्यमात काम करतात, असेही आहेत जे फक्त नाटकात काम करतात, काही असेही आहेत जे फक्त चित्रपटात काम करतात आणि असेही काही आहेत जे फक्त टेलिव्हिजनवरच काम करतात. त्यामुळे रंगभूमीवर सक्रीय असलेल्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर संकर्षण कऱ्हाडे. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे.”
संकर्षणबद्दल शशांक पुढे म्हणाला, “मंचावर गेल्यानंतर सादरीकरण करणं, प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं हे संकर्षणकडून शिकावं. तो माझ्याच वयाचा आहे. त्यामुळे मला रंगभूमीवर काही करायचं असेल तर मला त्याच्यासारखं करायला आवडेल. प्रशांत दामले, अशोक सराफ हे तर खूप मोठे आहेत. पण संकर्षण कदाचित टेलिव्हिजन करत असेल तर मी जे करतोय ते कदाचित त्याला जमणार नाही किंवा तो जे रंगभूमीवर करतो ते मला नाही जमणार. जसा अमेय वाघ. मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. मी ललित प्रभाकरचाही खूप मोठा चाहता आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव आणि स्थान कमावलेलं आहे.”
शशांक केतकर पुढे म्हणाला, “मी स्वत:ला खूप समजावलं आणि मला ते पटलंसुद्धा की जर नाटकात संकर्षण आहे, चित्रपटात अमेय आहे तर टेलिव्हिजनवर शशांक आहे. असं जर होणार असेल तर त्याचा मला अंदाज आहे. हे खूप समाधानी आहे की कुठेतरी आपलं स्थान आहे.”
