शशांक केतकर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्याचे मुद्दे स्पष्टपणे मांडताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी शशांकने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत, ६ वर्षे झाली तरी एका प्रसिद्ध मालिकेच्या निर्मात्याने पैसे दिले नाहीयेत असं जाहीरपणे सांगत आपला संताप व्यक्त केला होता. पहिल्या पोस्टमध्ये शशांकने कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. पण, यानंतरच्या पोस्टमध्ये शशांकने सविस्तर पुरावे शेअर करत या दिग्दर्शक-निर्मात्याचं नाव सोशल मीडियावर उघड केलं होतं. या संपूर्ण घटनेबाबत अभिनेत्याने नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

शशांक केतकर म्हणाला, “मला बाहेरून असं समजलं की त्या माणसाकडे पैसेच नाहीयेत देण्यासाठी…माझ्यासह अनेक कलाकारांचे, तंत्रज्ञांचे अनेकांचे पैसे थकवले गेले आहेत. ती सगळी एकूण जवळपास कोट्यवधींची रक्कम आहे. मी जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत सोशल मीडियावर व्यक्त होतो तेव्हा ती माझी तिसरी-चौथी स्टेज असते. त्याआधी मी पर्सनल लेव्हलला बोलून बघतो, मिटींग झालेल्या असतात. निर्माते, चॅनेल सगळ्यांशी मी बोलून घेतलं होतं. चॅनेलचा यात काहीच दोष नव्हता कारण, त्यांनी प्रोडक्शन हाऊसला पैसे दिलेले होते. आता त्याने ते पैसे कुठे वापरले वगैरे हा विषय वेगळा…पण, जेव्हा काहीच मार्ग निघाला नाही तेव्हा मला स्वत:चं मत मांडणं गरजेचं वाटलं. आम्ही सगळ्या कलाकारांनी चॅनेलला एक पत्र लिहिलं होतं. पण, त्याचं ( निर्मात्यांचं ) असं म्हणणं होतं की, चॅनेलकडून पैसे आले आणि नंतर त्याच्याकडून ते पैसे इनव्हेस्टर्स काढून घेतले. मग तुझा दोष नाहीये तर आम्हाला इनव्हेस्टर्सची नावं सांग. ती नावंही सांगितली नाहीत…मग आम्ही कोणाकडे जावं? शेवटी कुठलाच मार्ग उरला नाही मग आम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालो.”

शशांक पुढे म्हणाला, “मी जी पहिली पोस्ट शेअर केली होती…त्यात मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मग, त्या पोस्टनंतर त्याने मला मुद्दल जी होती ती परत केली. माझी फक्त टॅक्सची रक्कम बाकी आहे. पण, बाकीच्या लोकांची मुद्दल आणि टॅक्स असं सगळंच बाकी आहे.”

अभिनेता पुढे म्हणाला, “आवर्जून एक गोष्ट सांगतो, त्याला भरपूर काम मिळावं. कारण, तो माणूस प्रचंड हुशार आहे. मी सगळ्यांना स्वत: सांगितलंय की, त्याला घ्या…आजवर कमालीचे प्रोजेक्ट्स त्याने सादर केलेत. त्याला काम मिळालं नाहीतर तो पैसे कसे उभे करेल आणि पैसे नसतील तर तो आम्हाला पैसे देईल तरी कसे? हे सगळं विचित्र चक्रात अडकलं आहे. काही कलाकारांनी त्याचं नाव घेऊन पोस्ट शेअर केल्या. मग एका मुलाखतीत त्याने कमिट केलंय की, मी सहा महिन्यात पैसे देतो…पण, त्यानंतर सहा वर्षे जेव्हा तुमचे पैसे मिळत नाहीत तेव्हा या पोस्ट शेअर कराव्या लागतात.”

“सरतेशेवटी मी असं ठरवलंय की, बाकी कोणासाठी लढायचं नाही. मी आता फक्त माझ्यासाठी लढणार आहे. मला पैसे मिळाले तर मी आनंदी होईन. बाकीचे लोक त्यांचं बघतील.” असं स्पष्ट मत यावेळी शशांक केतकरने व्यक्त केलं.

दरम्यान, शशांकप्रमाणे ‘सुखाच्या सरींनी- हे मन बावरे’ मालिकेतील अन्य कलाकारांनी सुद्धा निर्मात्याने पैसे थकवल्याबद्दल संताप व्यक्त केला होता.