Shashank Ketkar shares video: शशांक केतकर हा नेहमीच त्याच्या अभिनयामुळे, त्याच्या विविध मालिका, चित्रपट, भूमिका यांमुळे चर्चेत असतो. याबरोबरच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

समाजात दिसणाऱ्या काही गोष्टी, वाहतुक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, कचरा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींबद्दल तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो, त्याचे मत मांडत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होतो.

नुकताच त्याने एका शाळेत मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्याला शाळेबाहेर काय पाहायला मिळाले याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. शाळेबाहेर कचरा पडल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले होते. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या.

आता शशांकने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “नमस्कार, आपण सगळ्यांनी मतदान केलं. मीही मतदान केलं. ज्या शाळेत मतदान केलं. त्या शाळेबाहेरच्या कचऱ्याचा व्हिडीओ पोस्ट केला. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. खूप जणांनी बघितला. शेअर केला. कौतुकाचा वर्षाव झाला.”

“कौतुक आणि ट्रोलिंग हे मी…”

“अनेकांचं म्हणणं होतं की तू कायम असा निर्भिडपणे बोलतोस, बोलत राहा. हे सगळ्या ऑथोरिटीजच्या नजरेस आणून देत राहा. आपल्या समाजासाठी, आजूबाजूच्या परिसरासाठी तू कायम असाच झटत राहतोस, हे करत राहा. काहींनी मला ट्रोल केलं.”

पुढे तो असेही म्हणाला, “कौतुक आणि ट्रोलिंग हे मी समान पातळीवरच मोजतो. त्यामुळे मी कधीच हुरळूनही जात नाही आणि माझं पाऊल मागेही टाकत नाही. कारण- मला माहित आहे की या सगळ्यामागे एक नागरिक म्हणून माझा काय उद्देश आहे.

व्हिडीओमध्ये पुढे त्याने ज्या शाळेबाहेर कचरा असल्याचे दाखविले होते, तिथे स्वच्छता केल्याचे. साफसफाई झाल्याचे दाखवले.

शशांक म्हणाला, “सकाळी मी तो कचऱ्याचा व्हिडीओ टाकला आणि लगेच त्यावर कारवाई केली. ज्यांनी अॅक्शन घेतली, त्यांचे मनापासून आभारी आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिक अगदी फोनवरसुद्धा बोललो आहे.फक्त मी त्यांना माझी नाराजी बोलून दाखविली की कचरा उचलला त्यासाठी अभिनंदन आणि आभारी आहेच. पण, आम्हा नागरिकांना तुम्हाला हे लक्षात आणून द्यावं लागतं की इकडे कचरा पडला आहे, अमुक एखाद्या ठिकाणी दररोज कचरा जमत आहे, कचरा उचलला जात नाही.”

“याबरोबरच रस्त्यात खड्डे आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. डबल पार्किंग होत आहेत. चुकीच्या दिशेने लोक येत आहेत. लोक कुठेही दुकाने लावत आहेत. नियमांचे पालन केलं जात नाही. तर या गोष्टी आम्हा नागरिकांना व्हिडीओच्या माध्यमांतून सांगितलं जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. कारण- तुम्ही आमचे पालक आहात आणि पालकांचं सगळ्या मुलांकडे, त्यांच्या घराकडे, समाजाकडे लक्ष असलं पाहिजे.”

“मागची ३०-४० वर्षे…”

“मी माझ्या आजुबाजूच्या परिसरासाठी असाच बोलत राहणार आहे. मला ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा बोलते व्हा. कारण-मागची ३०-४० वर्षे किंवा आपण अजून मागे गेलो. तर तेव्हा समजात, जगात घडणाऱ्या कोणत्याही घटनेबाबत ते विचार लेख-अग्रलेखातून,निबंध, मासिकं, भाषणांतून तेव्हा ते व्यक्त केलं जायचं.”

“मला ट्रोल करण्यापेक्षा…”

“आता सोशल मीडिया हे माध्यम आहे. तेव्हा ती जुनी पीढी, अभ्यासू वृत्ती म्हणून त्यांना आदर दिला जात असे. ही नवीन पीढी सोशल मीडियावर व्यक्त होते म्हणून उथळ, तर तसं नाही. प्रत्येक पीढीला त्यांचं त्याचं एक माध्यम मिळतं. त्या माध्यामातून आपण व्यक्त होत राहायचं असतं. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की मला ट्रोल करण्यापेक्षा त्याबद्दल बोला. तुमच्या हातात सोशल मिडिया आहे, त्याचा असा वापर करा.

पुढे शशांकचा मुलगा म्हणाला, “माझ्या बाबांनी सांगितलं ना की रस्ते, गार्डनर सगळे स्वच्छ ठेवायचे. घर स्वच्छ ठेवायचे. जर घरी मुले आली, त्यांचं लक्ष नसलं तर ती अडकून पडू शकतात. म्हणून आम्ही व्हिडीओ पाठवतोय.”

शेवटी शशांक असेही म्हणाला, “महानगरपालिका आपल्याला जे सगळं चांगलं देईल. ते सगळं चागंल्या पद्धतीने वापरण्याची जबाबदारी आपण उचलूया.”

दरम्यान, शशांक सध्या मुरांबा मालिकेत काम करत आहे.