Shashank Ketkar shares anecdote: अभिनेता शशांक केतकर हा विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. अक्षय या भूमिकेतून तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

याबरोबरच, अभिनेता सोशल मीडियावरही सक्रिय असतो. अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे, त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे तो चर्चेत येतो. आता त्याने एक व्हिडीओ शेअर करत एक किस्सा सांगितला आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

अभिनेता म्हणाला, “आयुष्यात कृतज्ञ असणे महत्वाचे आहे. पुढच्या पिढीलासुद्धा कृतज्ञता शिकवणेदेखील खूप गरजेचे आहे. एक छोटासा किस्सा सांगतो. मध्यंतरी मी, प्रियांका, ऋग्वेद व राधा जेवायला म्हणून बाहेर गेलो होतो. स्ट्रीट फूड आम्हा सगळ्यांना आवडतं. तिथे आम्ही खात असताना एक मुलगा आमच्याकडे बघत आमच्याजवळ आला.”

Award Banner

पुढे शशांक केतकर म्हणाला, “त्याने त्याच्या पिशवीतील काही पुस्तकं काढली आणि आमच्याबरोबर एक लहान मुलगा आहे, हे पाहून काका पुस्तकं घ्या, अशी विनंती त्याने केली. त्याच्याकडे बघून मला जिज्ञासा निर्माण झाली. कुठे राहतोय, काय करतोय हे त्याला विचारावं.”

“जेव्हा त्याने मला हे सांगितलं की तो सकाळी शाळेत जातो आणि रात्री त्याच्या बाबांना मदत म्हणून ही पुस्तकं विकतो. तेव्हा माझ्या व प्रियांका दोघांच्याही डोळ्यात चटकन पाणी आलं आणि आमच्यापेक्षाही जास्त त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ऋग्वेद उत्सुक होता.”

शशांक पुढे असेही म्हणाला, “मला तो मुलगा जास्त ग्रेट वाटला. कारण-आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी इतक्या लहान वयात कष्ट करत होता. आम्ही जे असे बाहेर जाऊन खातोय, फुगे, खेळणी विकत घेतोय तो हे सगळं लांबून बघतोय. अशा गोष्टी विकत घेण्यासाठी पैसा कमावणं गरजेचं आहे. पुस्तकं विकून पैसा कमावल्याशिवाय पैसा हातात येणार नाही, हे एवढ्या लहान वयात त्याला कळतं.हे बघून आम्हा सगळ्यांनाच खूप छानही वाटलं, हलकसं डोळ्यात पाणीही आलं. त्या मुलाबद्दलचा आदर वाढला. म्हणून आम्ही त्याच्याकडील ती पुस्तकं विकत घेतली.”

अभिनेता पुढे म्हणाला, “असे अनुभव सांगावेत की सांगू नयेत, असं बऱ्याचदा वाटत असतं. पण, कधी सांगितलंच नाहीत तर मला वाटतं की तर ते तुमच्यापर्यंत आणि पुढच्या पीढीपर्यंत कसे पोहोचणार? याचा परिणाम हा झाला आम्ही कुठेही बाहेर गेल्यानंतर जेव्हा असं एखादं लहान मुल ऋग्वेदला दिसतं. तेव्हा तो आपसुक म्हणतो की बाबा आपण त्याला मदत करुया.” असे म्हणत शशांकने त्याला आलेला अनुभव सांगितला.

हा व्हिडीओ शेअर करताना शशांकने, “सगळ्यांबद्दल चांगला विचार करावा”, अशी कॅप्शन लिहिली आहे.

नेटकरी म्हणाले…

शशांकच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे.”खूप छान. अशा अनुभवातूनच आपली मुलेदेखील नकळत खूप काही शिकून जातात”, “खरंच दुसऱ्यांसाठी चांगला विचार केला की आयुष्य आपोआप सुंदर होतं”, “खूप छान दादा”, “खूप छान. त्याच्याकडील पुस्तकं विकत घेऊन केलेली छोटी मदत त्या मुलासाठी खूप मौल्यवान आहेत. याची जाणीव लहान वयात ऋग्वेदला झाली आहे. हेच संस्कार मुलांवर केले गेले पाहिजेत”, “शशांक एकदम बरोबर बोललास. सगळ्यांबद्दल चांगला विचार करावा. कधी कधी लहान मुलंही आपल्याला माणुसकीचा खरा अर्थ शिकवतात. खूप छान सुंदर अनुभव आहे”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी शशांकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शशांक कैरी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या आगामी काळात तो कोणत्या चित्रपटात दिसणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.