Shashank Ketkar : लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकर त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. शशांकने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन न करता काहीजण कसे बिनधास्त, कोणालाही न घाबरता…एका दुचाकी गाडीवरून कितीही जण प्रवास करताहेत हे पाहायला मिळतंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
शशांक शूटिंगनिमित्त दररोज प्रवास करत असतो. वाहतूक कोंडी, रस्त्यावरचे खड्डे असो किंवा कचरा अशा बऱ्याच गोष्टींबाबत अभिनेता आपलं स्पष्ट मत मांडताना दिसतो. मात्र, यावेळी त्याने काहीसा हटके व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शशांक आपल्या चारचाकी गाडीतून प्रवास करताना दिसतोय. तर, त्याच्या समोरून जाणाऱ्या स्कुटीवर ( दुचाकी ) एकाचवेळी तब्बल पाच जण प्रवास करत असल्याचं पाहायला मिळतंय. खरंतर दुचाकीवर एकावेळी फक्त दोन जणांना प्रवास करण्याची परवानगी आहे. पण, शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या दुचाकीवर चक्क पाच जण बिनधास्त फिरताना दिसताहेत.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना “हे पाच जण एका स्कुटीवर कसे काय बसले?” असा प्रश्न पडला आहे. शशांक केतकर यामध्ये म्हणतो, “काय तो रस्ता, काय ती हवा अन् काय तो आत्मविश्वास…लय भारी! एका गाडीवर पाच माणसं, #सहलीला जायचा, जायाचं सहलीला…आय लव्ह इट! असंच पाहिजे त्या गाडीला.”
शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक कलाकारांनी या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये हसायचे इमोजी दिले आहेत. तर अन्य युजर्स म्हणतात, “चालवणाऱ्याची खरी हिंमत”, “खरा आनंद घेत आहेत जीवनाचा… BMW वाला पण इतका आनंदी नसेल”, “ही सर्वगुणसंपन्न माणसं फक्त आणि फक्त आपल्या देशात सापडतात. हे कलागुण बाहेर नाही गेले पाहिजेत”, “खरंच म्हणतात ना इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स तेच खरंय”, “शशांक अरे काय हे…कमाल आहे त्या गाडीची आणि त्या चालकाची”, “बाकी असचं पाहिजे त्या गाडीला आवडलाय व्हिडीओ” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, शशांक केतकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

