Shashank Ketkar : शशांक केतकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांमध्ये त्याने काम केलं आहे. आतापर्यंत त्याने अनेक मालिकांमध्ये आणि इतर कलाकृतींमध्ये काम केलं आहे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुरांबा’ या मालिकेत काम करत आहे. गेली जवळपास साडे चार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
शशांकर इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी सक्रिय असतात पण, शशांक त्याचा वापर सामाजिक गोष्टींमध्ये चांगला बदल व्हावा यासाठी प्रामुख्याने करत असतो. अशताच आता नुकतीच राजश्री मराठीला त्याने मुलाखत दिली असून यामध्ये त्याने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दलही त्याचं मत मांडल आहे. याचवेळी त्याने आध्यत्मा किंवा श्रद्धा याबद्दल त्याला काय वाटतं ते सांगितलं आहे.
मी अंधभक्त नाही – शशांक केतकर
शशांकने यावेळी तो हिंदू आहे पण, अंधभक्त नाही असंही म्हटलं आहे. मुलाखतीत अभिनेत्याला, शशांक केतकर आध्यात्मिक आहे, देवावर विश्वास आहे का? असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हल्ली माझा यावर खूप विश्वास बसत चालला आह. पण, आजही मी त्याच मताचा आहे की चांगलं किंवा वाईट होत असेल तर ते माझ्यामुळे. मी देवाला यासाठी दोषी ठरवत नाही. देवासमोर हात जोडायला मला आवडतात. मी भयंकर स्वाभिमानी आणि अभिमानी हिंदू आहे पण, मी अंधभक्त नाहीये. की दररोज मी देव देवच करतोय आणि ते केल्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही. असं अजिबात नाही. पण, मी त्याचा कधी अपमान करत नाही. दररोज बाहेर जात असताना नमस्कार करतो.”
शशांकने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. मालिकांमुळेच त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’ अशा अनेक मालिकांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, शशांक सोशल मीडियावर खूप सक्रिया असतो आणि त्याच्या कामासंर्भातील अपडेट, दैनंदिन जीवनातील घडामोडी तसंच आजुबाजूच्या गोष्टींबद्दलची माहिती तो यामार्फत सगळ्यांबरोबर शेअर करत असतो ज्यासाठी त्याचं अनेकांकडून कौतुक होत असतं.
