चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच तो ‘स्कॅम २००३’ या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकला होता. या सीरिजमधील त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. शशांकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर २०१७ मध्ये त्याने त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. प्रियांका सुद्धा शशांकप्रमाणे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या दोघांची जोडी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. प्रियांकाने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशांक नुकताच मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढत पुण्याला गेला होता. यावेळी बायकोबरोबर खरेदी करण्यासाठी त्याने कोणतीही महागडी दुकानं किंवा मॉलची निवड न करता तुळशी बागेला प्राधान्य दिलं. पुण्यातील तुळशी बाग म्हणजे खरेदी करण्यासाठी स्त्रियांचं आवडतं ठिकाणं. तुळशी बागेच्या गर्दीत कोणीही ओळखू नये म्हणून शशांक खास मास्क लावून गेला होता.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने र कार्यक्रमात रितेश देशमुखला पाहिलं अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आपल्या…”

प्रियांकाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “ते मॉल्समध्ये शॉपिंग करणं वगैरे ठिक आहे…पण, तुळशी बागेत शॉपिंग करायला जाणं म्हणजे मनात एक वेगळीच भावना असते.” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. शशांक एवढा मोठा कलाकार असून साध्या बाजारात खरेदीसाठी गेल्याने नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “मानसी नाईकने तुझ्यावर आरोप केले, पण…”, ‘चंद्रमुखी’च्या वादावर चाहतीचा प्रश्न; अमृता खानविलकर म्हणाली…

शशांक-प्रियांकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी, “पाय जमिनीवर असलेला नट”, “तुळशीबागेत गर्दीत शॉपिंग केल्यावर खरंच मजा येते”, “सगळ्या पुण्यातील पोरी हळहळल्या असतील”, “कोणी ओळखले कसे नाही” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, झी मराठीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर त्याने ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम केलं. सध्या शशांक ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar went for shopping with his wife priyanka at pune tulshi baug sva 00
First published on: 02-12-2023 at 12:30 IST