Sheetal Kshirsagar entry in Tarini: ‘तारिणी’ या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील तारिणी व केदार जितके प्रेक्षकांचे लाडके आहेत, तितकीच मालिकेतील इतर पात्रेही आहेत.
प्रत्येक पात्राचा स्वभाव वेगळा, वागण्या-बोलण्याची पद्धत वेगळी, भूतकाळातील अनुभवांमुळे आलेली कटुता, किंवा सुमी आजीसारखा समजुतदारपणा, दयानंद खांडेकर यांच्या डोळ्यांत पश्चात्ताप, तर केदारमुळे मुलगा युवराजला दुय्यम वागणूक मिळू नये यासाठी पद्मिनी काकूंची चाललेली धडपड, घराला सांभाळून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारी कौशिकी ही आणि मालिकेतील सगळीच पात्रे लक्ष वेधून घेत असतात.
नुकतीच मालिकेत नवीन एन्ट्री झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तारिणीच्या टीममध्ये एक नवीन ऑफिसर येणार असल्याचे सांगतिले होते. त्यामुळे नवीन ऑफिसर कोण असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये नवीन ऑफिसर म्हणजे हरप्रीत चड्ढा ही भूमिका कोण साकारणार हे समोर आले आहे. ही भूमिका अभिनेत्री पायल जाधवने साकारली आहे. हरप्रीत उर्फ रेवा ही केदारची चांगली मैत्रीण असल्याचे समोर आले आहे.
सिद्धीरुपा करमरकरची मालिकेतून एक्झिट
आता या सगळ्यात मालिकेत आणखी एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मालिकेत पद्मिनी काकूंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकरची मालिकेतून एक्झिट झाली आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्रीने पद्मिनी ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलगा युवराज प्रति असलेले तिचे प्रेम, खांडेकर कुटुंबात त्याला प्रेमाने वागवले जावे, त्याच्यावर अन्याय होऊ नये किंवा त्याला मिळत असलेल्या प्रेमात इतर कोणी येऊ नये, असे पद्मिनीला वाटत होते. या सगळ्यात अनेकदा ती अनेकदा इतरांवर अन्याय करताना, कट कारस्थान करताना, इतरांशी भांडताना दिसली. आता सिद्धीरुपा करमरची एक्झिट झाल्यानंतर पद्मिनी खांडेकरची भूमिका एक लोकप्रिय अभिनेत्री साकारणार आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम शीतल क्षीरसागर यांची एन्ट्री
अभिनेत्री शीतल क्षीरसागर पद्मिनी काकूंच्या भूमिकेत दिसणार आहेत. शीतल क्षीरसागर यांनी सोशल मीडियावर पद्मिनी खांडेकरचा लूक असलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, ‘तारिणी’ या झी मराठीवरील मालिकेतून मी पुन्हा एका नवीन प्रवासाला उत्सुकता , आशावाद , आनंद , अपेक्षा आणि कुतूहल ह्यांची शिदोरी घेऊन निघाले आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आर्शिवाद पाठिशी असू देत.”
अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी झी मराठी वाहिनीवर त्यांचे स्वागत केले आहे. तर अनेकांनी अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
शीतल क्षीरसागर यांनी या आधी झी मराठी वाहिनीवर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते.
दरम्यान, आता तारिणी मालिकेत नेमके काय ट्विस्ट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
