Shilpa Shinde false case on producers : ‘बिग बॉस ११’ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने २०१७ साली केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण मालिकाविश्वात एकच खळबळ उडाली होती. ‘भाबीजी घर पर हैं!’ मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळ आणि मानधन न दिल्याचे गंभीर आरोप करत शिल्पाने मालिका सोडली होती. या प्रकरणाची त्या काळात मोठी चर्चा रंगली होती. आता ११ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने पहिल्यांदाच मोठा खुलासा करत, लैंगिक छळाचे आरोप खोटे असल्याची कबुली दिली आहे.

अभिनेत्री शिल्पा शिंदेने ‘भारती टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये घडलेल्या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामुळे मालिका विश्वामध्ये काम मिळणे कमी झाल्याचे सांगितले आहे. शिल्पा म्हणाली की, मी एकच वर्ष ‘भाबीजी घर पर हैं’ ही मालिका केली होती, पण त्याआधी मला घाबरवण्यासाठी कॉन्ट्रक्ट तयार करण्यात आले होते. यामध्ये दुसरीकडे कोणते काम घेणार नाही अशा अटी होत्या. घाबरवून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. १० दिवसांचे शूटिंग केवळ दोन दिवसांमध्ये संपवण्यात आले आणि आता सुट्टी आहे, असे सांगण्यात आल्याचे शिल्पा शिंदेने सांगितले आहे.

आजही त्यांना व्हाईट कॉलर माफिया म्हणते – शिल्पा

पुढे शिल्पा शिंदे म्हणाली, माझ्यासारख्या वाघिणीला हे मांजर समजवून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. पुढे कुठेच काम मिळणार नाही आणि घरी बसवून ठेवेन, अशा धमक्या देत होते. निर्मात्यांनी कुठेच काम मिळणार नाही याचे प्रयत्न केले, म्हणून मी त्यांना आजही छातीठोकपणे व्हाईट कॉलर माफिया म्हणते. वकिलांना पैसे देऊन खरेदी केले होते, अशी परिस्थिती शिल्पा शिंदेने मांडली आहे.

लैंगिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केला

या मुलाखतीमध्ये शिल्पा शिंदेने लैंगिक छळाचे आरोप खोटे असल्याचा मोठा खुलासा केला आहे. लैंगिक छळ झाल्याचे खोटे सांगितले असल्याची कबुली तिने दिली. शिल्पा म्हणाली, “ही गोष्ट कुणालाच माहिती नाही; पण मला खरे बोलायला भीती वाटत नाही आणि आजही मी तेच सांगणार आहे. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता, त्यामुळे मी माझ्या निर्मात्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. नंतर हे प्रकरण परस्पर सहमतीने मिटले. हे पहिल्यांदाच सर्वांसमोर सांगते आहे,” असे शिल्पा शिंदे म्हणाली आहे.

कोणीही साथ दिली नाही म्हणून… – शिल्पा

शिल्पा शिंदे पुढे म्हणाली, “तेव्हा परिस्थितीच अशी होती की कोणत्याही निर्मात्याने मला साथ दिली नव्हती, त्यामुळेच मी ती केस दाखल केली. पोलिसही एफआयआर दाखल करताना वाईट शब्दांत आरोप लिहावे लागतील असे सांगत होते. माझे कायद्याचे शिक्षण असल्यामुळे मला हे माहिती होते. आज मी पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगत आहे की ते आरोप खोटे होते. नंतर आमच्यामध्ये बोलणी झाली आणि तीन महिन्यांपासून अडकलेले माझे मानधनही मला मिळाले,” असे शिल्पा शिंदेने नमूद केले.

पुन्हा का केली ‘भाबीजी घर पर हैं मालिका?

तिने पुढे सांगितले, “११ वर्षांनंतरही मी पुन्हा ‘भाबीजी घर पर हैं!’ मालिका केली, कारण आमचे लेखक मनोज संतोषी यांची ती इच्छा होती. या सगळ्या वादामध्ये त्यांनाही खूप दुखावले होते. एवढा मोठा वाद झाल्यानंतर आज मी पुन्हा त्यांच्यासोबत काम करत आहे आणि आता आमचे संबंध खूप चांगले आहेत,”असे अभिनेत्री शिल्पा शिंदेने सांगितले आहे.