Shilpa Shirodkhar Supports Pranit More : ‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. लवकरच ‘बिग बॉस’चा अंतिम भाग प्रसारित होणार आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच मालती चहरची एक्झिट झाली. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल हे स्पर्धक आहेत.
‘बिग बॉस’च्या घरात आता शेवटचे काही दिवस राहिले असून या स्पर्धकांपैकी कोण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी पटकावणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे पहायला मिळतेय; तर सध्या सोशल मीडियावर अनेक जण त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत. प्रेक्षकांसह कलाकार मंडळीही सोशल मीडियावरून त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत.
शिल्पा शिरोडकरने केलं प्रणित मोरेचं कौतुक
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, जिने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभाग घेतला होता तिने आता ‘बिग बॉस’बद्दल एक्सवर ट्विट करत तिच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला आहे. तिने यावेळी या पोस्टमधून म्हटलं की, “मला माहितीये प्रत्येकाचा कोणीतरी आवडता स्पर्धक आहे. पण, माझ्यासाठी फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे प्रणित मोरे. मला असं खूप मनापासून वाटतं की तो एकमेव असा स्पर्धक आहे, जो सातत्याने खरा वागला आहे. आपणही त्यांच्याबरोबरच स्वत:ला रिलेट करतो, जे खूप खरे वाटतात आणि तो अगदी तसाच आहे.”
शिल्पा पुढे म्हणाली, “तो एक खरा हिरो आहे. जर तुम्हालाही माझ्यासारखंच वाटत असेल तर प्लीज त्याला वोट करा. आपण सगळे मिळून वोट करुन त्याला जिंकवूया.” शिल्पा शिरोडकरने प्रणितसाठी एक्सवर पोस्ट केल्याने त्याच्यासाठी ही मोठी गोष्ट ठरली आहे. यापूर्वीसुद्धा अनेक सोशल मीडिया एन्फ्लूएन्सरने प्रणितला पाठिंबा दिला, त्यामुळे आता तोच या पर्वाचा विजेता व्हावा अशी अनेकांची इच्छा असल्याचं दिसतं.
Okay, look, I know everyone has their favorites, but for me, there is only one choice @Rj_pranit. I genuinely feel like he's the only one who didn't put on a front, he was just real. We all connect with people who are unapologetically themselves, and that's exactly what he is A…
— Shilpa shirodkar (@Shilpashirodkr) December 4, 2025
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या प्रणित आणि गौरव खन्ना यांच्यापैकी कोणीतरी विजेते पद पटकवावं असे अनेक रील व्हायरल होताना दिसत आहेत. पण, ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलेलं आहे हे रविवारीच समोर येईल.
