Shiv Thakare New Hairstyle Cornrow Braids Reaction: रिअॅलिटी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे हा त्याच्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेला शिव ठाकरे त्याचे अपडेट शेअर करीत असतो. नुकताच त्याने कॉर्नरो ब्रेड्स (Cornrow Braids) अशी हेअरस्टाईल केली आहे. शिव ठाकरेचा नवा जबरदस्त लूक नेटकऱ्यांना आवडला असून, त्यावर त्याच्या आई व आजीने दिलेली भन्नाट प्रतिक्रियासुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठमोळ्या शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर त्याचा कॉर्नरो ब्रेड्स केलेला व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये त्याने सुरुवातीला केसांमुळे आलेला त्याचा स्टायलिश लूक दाखवला. पूर्ण केसांना त्याने केलेल्या कॉर्नरो ब्रेड्स हेअरस्टाईलमुळे शिव ठाकरे वेगळाच दिसून येत होता. सलूनमध्ये जबरदस्त लूक केल्यानंतर घरी आल्यावर शिव ठाकरेच्या घरच्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे.
कडब्याच्या पेंडीसारखे कडक – शिवच्या आईची प्रतिक्रिया
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिव ठाकरे घरी आल्यानंतर त्याच्या आईला ‘केस बघ एकदा, हात लावून बघ’ असे म्हणतो. त्यावर शिव ठाकरेची आई आशा ठाकरे म्हणतात, ‘व्वाव… पण हे डोक्याला काय लावलंय, सगळं कडक झालंय ना हे. कडब्याच्या पेंडीसारखे कडक झाले आहेत.’ त्यानंतर शिव ठाकरे त्याच्या आजीला म्हणतो ‘बघ बरं हे चांगलं दिसतंय का?’ त्यावर आजी म्हणते, ‘बाप्पा..बाप्पा…हे काय झालंय रे…? कडक कडक काय केलंय रे हे? जा तिकडं…’, अशी भन्नाट प्रतिक्रिया शिव ठाकरेच्या कुटुंबीयांनी दिल्या आहेत.
नवीन हेअरस्टाईलवर कुटुंबीयांनी तुफान प्रतिक्रिया दिलेला व्हिडीओ शेअर करीत शिव ठाकरेने लिहिले, “बाहेरचे सगळे ‘स्लेयर’ म्हणत आहेत; पण घरी ‘हे काय केलं रे?’ ” शिव ठाकरेच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, ”आजी आणि आई खूपच विनोदी आहेत, मला तुझे कुटुंब खूप आवडते.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ”मी तोच विचार करत होतो की, शिव ठाकरेच्या घरचे यावर काय म्हणतील.” आणखी एका नेटकऱ्याने ”एमसी स्टॅनकडून प्रेरणा घेतलीये.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, ”विदर्भाची भाषा किती गोड आहे.”
