Shiv Thakare on Marriage: शिव ठाकरे हा विविध रिअॅलिटी शोसाठी ओळखला जातो. रोडीज, बिग बॉस मराठी २, बिग बॉस १६, द ५० अशा विविध रिअॅलिटी शोसाठी तो ओळखला जातो. ‘बिग बॉस मराठी २’चा तो विजेता ठरला होता. ‘बिग बॉस १६’चा उपविजेता ठरला. तर, ‘द ५०’चा तो विजेता ठरला. या शोंमधून त्याने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्याचा खेळ, इतर स्पर्धकांबरोबरचे वागणे यांतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
शिव ठाकरे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो काही वेळा त्याच्या दैनंदिन आयुष्यातील खास गोष्टी व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करतो. त्याचे त्याच्या कुटुंबावर अतिशय प्रेम आहे. आजीबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. चाहते त्याच्या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करतात. त्याबरोबरच, शिव म्युझिक व्हिडीओंमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
“त्यासाठी मी खूप कृतज्ञ…”
आता शिव त्याच्या कोणत्याही कामामुळे नाही, तर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. शिव ठाकरेने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने त्याच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले. शिव नेमकं काय म्हणाला आहे, याबद्दल जाणून घेऊ…
शिव ठाकरेला विचारले की, मागे वळून पाहताना कोणती गोष्ट करायची राहिली किंवा करायचीच आहे? यावर शिव ठाकरे म्हणाला, “मी काही करायचं सोडलंच नाही. मी पूर्ण कॉलेज लाईफ जगलोय. मी माझ्या कुटुंबाला वेळ देतोय. मी माझ्या मित्रांबरोबर अजूनही वेळ घालवतोय. काम करतोय. कुठे प्रवास करायचा असेल, तर तोही करतोय. अशी कुठली गोष्ट नाही की राहिली आहे. आता मी जिथे आहे, त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. मला माहीत आहे की, खूप मेहनत करायची आहे. आपण त्या ठिकाणी पोहोचलोय, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लाखो लोक मेहनत करतात. मी प्रयत्न करतो की, माझ्या माध्यमातून एका तरी व्यक्तीला पुढे जाण्याची संधी मिळावी. मला नेहमी वाटतं की, पहिली पायरी मिळाली की, इतर लोकांना हात द्या. जेव्हा तुम्ही पाचव्या-दहाव्या पायरीला जाऊन थकाल तेव्हा तो हात मदतीसाठी येईल. त्याला कर्म म्हणतात. माझी आई वगैरे जास्त आध्यात्मिक आहे; तर माझा त्यावर विश्वास आहे. माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
पुढे शिव हसत म्हणाला, “आता लग्नाशिवाय करायचं काही राहिलंच नाही; पण मला लग्न करायचं नाही. सध्या ज्या पद्धतीच्या घटना समाजात घडत आहेत, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. आधी लग्नाची व्याख्या हीच होती की, एकत्र म्हातारे व्हायचे; पण आता तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे मला आता लग्न करायचंच नाही, अशी माझी मानसिकता झाली आहे.”
दरम्यान, शिव ठाकरे लग्न करणार की नाही, हे आगामी काळात समजू शकेल. आता तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
