Kon Honar Crorepati Shiv Thakre : अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्ट करत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ या शोमध्ये नुकतीच लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी उपस्थिती लावली होती. माधुरीला प्रत्यक्ष पाहणं, तिच्याबरोबर संवाद साधणं हा या दोघांसाठीही स्वप्नपूर्तीचा क्षण होता. गौतमीने यावेळी नृत्याबद्दलच्या आपल्या भावना, यापूर्वी झालेल्या चुका याबद्दल माधुरीसमोर आपलं मन मोकळं केलं. इतकंच नव्हे तर, ती धकधक गर्लसमोर ती ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यावर सुद्धा थिरकली.

शिव ठाकरे सुद्धा महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे एका गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर केले होते. यामध्ये शिव आणि गौतमी लग्नाच्या लूकमध्ये दिसत होते. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या लग्नाची अफवा पसरली होती. यानंतर शिवने हे फोटो शूटिंगदरम्यानचे असल्याचे स्पष्ट केलं होतं. हाच किस्सा माधुरीने शिवला करोडपतीच्या मंचावर विचारला.

“तुमच्या लग्नाची एकदम सर्वत्र अफवा पसरली होती. त्याबद्दल काय सांगाल?” असं माधुरी विचारताच शिव स्वत:ही हसु लागला.

शिव म्हणाला, “मी मस्ती-मस्ती म्हणून एक फोटो शेअर केला…त्यानंतर मग तो फोटो खूप व्हायरल झाला. सर्वांचे फोन येऊ लागले…मला मेसेजही आले. अगदी माझ्या आईला सुद्धा काही लोकांनी फोन केले. मग आई म्हणते, अरे तुझ्यामुळे मला सर्व नातेवाईकांचे फोन येत आहेत की, तुम्ही शिवच्या लग्नाला बोलावलं नाही.”

शिव ठाकरे व गौतमी पाटील करोडपतीमध्ये सहभागी झाल्याचा हा विशेष भाग आज रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.