Shiv thakare supports bigg boss marathi season 6 fame vishal kotian : ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहा आता शेवटाकडे आला आहे. नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात शेवटचा कॅप्टन्सी टास्क पार पडला असून वाईल्ड कार्ड सदस्य रेवा कौरासे या सीझनची शेवटची कॅप्टन ठरली आहे. त्यामुळे आता शो रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे आणि लवकरच या शोचा फिनालेसुद्धा पार पडेल. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ सीझन दोनचा विजेता शिव ठाकरेनं याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

शिव ठाकरे मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्यानं अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. अलीकडेच त्याने ‘द ५०’ या शोचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. अशातच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला ‘बिग बॉस मराठी’बद्दलही विचारण्यात आलं. यावेळी त्यानं या सीझनमधील विशाल कोटियन याला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे. शिव ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाबद्दल नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाबद्दल शिव ठाकरे काय म्हणाला?

मुलाखतीत शिवला ‘बिग बॉस मराठी’ तुझी ओळख आहे. तू बिग बॉस मराठी बघतोय का आणि तुला याबद्दल एकंदरीत काय वाटतंय असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “मी खरंच शो फॉलो करू शकलो नाही. कारण मी द ५०मध्ये होतो. आता निघालोय आणि धावपळ सुरू आहे. मी क्लीप्स बघतो शो चांगला सुरू आहे आणि चांगला टीआरपी आहे. मला याचा आनंद आहे. कारण मला असं वाटतं की ज्या शोनं मला बनवलं आहे. तो शो जेव्हा हिट होतो तेव्हा अभिमान वाटतो की चला बिग बॉस मराठी चांगलं सुरू आहे. त्यात जो विशाल कोटियन आहे तो माझा खूप चांगला मित्र आहे.”

Award Banner

शिव पुढे म्हणाला, “गेमबद्दल विचाराल तर तो मी पाहिलेला नाहीये. पण तो माझा मित्र आहे त्यामुळे जर मला पाठिंबा द्यायचा असेल तर मी त्याला करेन.” शिवनं पूर्वी याच पर्वातील अमरावतीच्या रोशन भजनकरला पाठिंबा दिला होता.

शिवला पुढे मराठीत काम करण्याबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “मी मराठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना का दिसत नाहीये. समजत नाहीये मला. पण, काही लोकांबरोबर बोलणं सुरू आहे. मी नक्कीच मराठीत काम करणार आहे. मराठी सिनेमा करायचा आहे.”