‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोमुळे सर्वाधिक चर्चेत आलेला मराठमोळा स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव या शोच्या विजेतेपदापासून थोडक्यासाठी हुकला. पण त्याने उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांची मनं जिंकली. दरम्यान शिववर यावेळी अनेक आरोपही करण्यात आले. दिग्दर्शक साजिद खानबरोबर त्याची असलेली मैत्री ही चित्रपट मिळवण्यासाठी असल्याचं बोलण्यात आलं. यावरच शिवने भाष्य केलं आहे.
‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये शिवची साजिद खान, निमृत कौर, अब्दू रोझिक, एमसी स्टॅन, सुम्बुल तौकिर यांच्याशी घट्ट मैत्री झाली. पण साजिदच्या प्रभावाखाली शिव असल्याचं अनेकदा बोलल गेलं. याबाबतच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिव म्हणाला, “लोकांना असं वाटत असेल पण मला असं वाटत नाही. साजिद खान एक व्यक्ती म्हणून चांगले आहेत. चांगल्या व्यक्तीबरोबर उभं राहणं महत्त्वाचं असतं.”
“अब्दू, निमृत, एमसी स्टॅन, सुम्बुलशीही मी मैत्री केली. त्यांच्याशी केलेल्या मैत्रीमुळे मला काय मिळणार आहे. फायद्यासाठी कोणतीही गोष्ट केली जात नाही. जे लोक मातीशी जोडले गेले आहेत ते फायद्यासाठी नव्हे तर माणसांवर प्रेम करतात. कितीही मोठा व्यक्ती असेल किंवा कितीही मोठा दिग्दर्शक असेल तर तो त्याच्या जागी असणार. माणूस चांगला असेल तर मी त्याला साथ देणार.”
पुढे शिव म्हणाला, “माझ्या घरी जरी साजिद खान किंवा करण जोहर असते तरीही मी जोपर्यंत त्या भूमिकेसाठी पात्र नाही तोपर्यंत मला चित्रपटात कोणीही घेणार नाही. किंवा माझ्यावर १०० कोटी पैसे खर्च करणार नाही. पण माझ्या मेहनतीवर काम मिळणार हे मला माहित आहे.” शिवने सातत्याने टीका करणाऱ्यांना अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे.