मराठमोळा अभिनेता आणि ‘रिअॅलिटी शोचा किंग’ म्हणून ओळखला जाणारा शिव ठाकरे ‘द ५०’ (The 50) या रिअॅलिटी शोचा विजेता ठरला आहे. या विजयामुळे त्याने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या या शोमध्ये तब्बल ५० स्पर्धक सहभागी झाले होते. सर्वांना मागे टाकत शिव ठाकरेने शोचे विजेतेपद पटकावले आहे.
शिवच्या या प्रवासात एक महत्त्वाचा ट्विस्ट आला होता. सेमीफायनल दरम्यान, प्रिन्स नरुलाने स्वतः जिंकलेले ‘तिकीट टू फिनाले’ शिव ठाकरेसाठी त्यागले होते. आपल्या मित्राला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी प्रिन्सने शो सोडला, ज्यामुळे शिवला अंतिम फेरीत पोहोचता आलं. अंतिम फेरीत एक कठीण पझल टास्क देण्यात आला होता. शिवने हे आव्हान अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करून फैजूला मागे टाकले आणि विजेतेपदावर मोहोर उमटवली.
टॉप ३ कोण होते?
ग्रँड फिनालेमध्ये शिव ठाकरेचा सामना मिस्टर फैजू (फैसल शेख), कृष्णा श्रॉफ, रजत दलाल आणि काका यांच्याशी होता. या शोमध्ये टॉप ५ स्पर्धकांपैकी शिव ठाकरे विजेत ठरला. सोशल मीडिया स्टार मिस्टर फैजू हा पहिला उपविजेता ठरला, तर कृष्णा श्रॉफने दुसरे उपविजेतेपद पटकावले.
ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम
शिव ठाकरेने ‘द ५०’ च्या पहिल्या सीझनची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. त्याला बक्षीस म्हणून तब्बल ५० लाख रुपये मिळाले आहे. शोच्या नियमांनुसार, शिवने जिंकलेली ५० लाख रुपयांची ही रक्कम त्याच्या एका नशीबवान चाहत्याला मिळाली आहे. सीताराम प्रल्हाद अघाव असं या चाहत्याचं नाव आहे. शिवने हे बक्षीस आपल्या चाहत्यासाठी जिंकल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘द ५०’ जिंकल्यानंतर शिव आता दोन मोठ्या रिअॅलिटी शोचा विजेता ठरला आहे. शिव बिग बॉस मराठी २ चा विजेता ठरला होता आणि आता त्याने द ५० (सीझन १) चे विजेतेपद पटकावले आहे. तसेच तो बिग बॉस हिंदी १६ चा उपविजेता ठरला होता. खतरों के खिलाडी १३ चा तो फायनलिस्ट होता.
‘द ५०’ या शोमध्ये अरबाज शेख, निक्की तांबोळी, दिव्या अग्रवाल जाह्नवी किल्लेकर, आर्या जाधव, वंशाज सिंह, सपना चौधरी, मनीषा रानी, कृष्णा श्रॉफ, अदनान शेख, फैज बलोच, हसनैन खान, शादान फारूकी, रिद्धी डोगरा, भव्या सिंह, विक्रांत सिंह राजपूत, प्रिन्स नरुला,उर्वशी ढोलकिया, रविंदर सिंह, कृष्णा श्रॉफ, अर्चना गौतम, नेहल चुडासमा, रजत दलाल, काका यांच्यासह तब्बल ५० स्पर्धक सहभागी झाले होते.
