Shiva Serial Upcoming Twist: ‘शिवा’ या मालिकेत सध्या शिवा व आशुवर नवीन संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवा व आशू एका पार्टीला गेले असताना, त्याने त्याच्या सहकारी अंजलीवर जबरदस्ती केली असा आशूवर आरोप केला आहे. या सगळ्यात आशूला अटकदेखील केल्याचे पाहायला मिळाले.
आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘शिवा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये किर्ती घरच्यांसमोर शिवाला पार्टीत गेल्याबद्दल जाब विचारताना दिसत आहे. तसेच ती शिवाला शिक्षा होईल, सिताईने तिला रागवावे याची वाट पाहत आहे.
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, शिवा म्हणते, मला नव्हतं वाटलं की असं काही होईल. किर्ती तिला म्हणते, अगं पण तुला अक्कल नाही का? आई सांगत होती जाऊ नकोस, पण ऐकलं नाहीस. तुला तुझं खरं करायची सवय लागली आहे. पुढे सिताई शिवाला म्हणते की तुझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे, याचा तुला अंदाज आहे का? नाही शिवा, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये.”
सिताईचे ते बोलणे ऐकून किर्ती मनात म्हणते की आता हिच्या चांगलीच कानाखाली बसणार आहे, आता येईल मजा. आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “शिवाचं वागणं सिताईला खटकणार?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे राम भाऊंनी ऑफिसमधील एका कामाची जबाबदारी आशूवर दिली होती. ती मीटिंग करू नये म्हणून त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन येत होते. त्याला न जुमानता आशूने देसाई कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले. त्यानंतर त्याच्या ऑफिसमधील सहकारी अंजलीने त्याला पार्टीसाठी आमंत्रित केले. त्या पार्टीला आशूसह शिवादेखील गेली होती. मात्र, शिवाला फोन आल्याने ती काही वेळासाठी तिथून बाहेर गेली.
संधीचा फायदा घेत अंजलीने आशूच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले. त्यानंतर आशूला बेशुद्ध झाला. त्यानंतर तिने आशूने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला, तर आशूने त्याला काहीच आठवत नसल्याचे म्हटले. तसेच, त्याच्याविरुद्ध पुरावेदेखील सादर केले. आता आशूला सोडवण्यासाठी शिवा प्रयत्न करत आहे. अंजली हे सर्व कोणाच्यातरी सांगण्यावरून करत आहे. पण, ती व्यक्ती नेमकी कोण हे मात्र समोर आले नाही.
आता मालिकेत पुढे काय होणार, शिवा आशूला सोडवण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.