Shivani Mundhekar on Ichhadhari Nagin: शिवानी मुंढेकरने ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिने साकारलेली रमा ही भूमिका लोकप्रिय ठरली. आता ‘मुरांबा’ मालिकेनंतर शिवानी झी मराठी वाहिनीवरील ‘इच्छाधारी नागीण’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“मीसुद्धा अपेक्षा केली नव्हती”
शिवानीने नुकताच राजश्री मराठीशी संवाद साधला. या मुलाखतीत ती तिच्या इच्छाधारी नागीण मालिकेतील भूमिकेबद्दल म्हणाली, “सगळं नवीन आहे, गोष्टी पहिल्यांदा करताना ज्या भावना असतात, थोडीशी धाकधूक असते, थोडा उत्साह असतो. पण, उत्साह खूप जास्त आहे. कारण- आता जे तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्याची मीसुद्धा अपेक्षा केली नव्हती, छान वाटतंय.”
शिवानी पुढे म्हणाली, “मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत. जे वेगळं असेल ते माझ्या वाट्याला यावं आणि माझ्याकडून ते करून घेतलं जावं, हे मी मेनिफेस्ट केलं होतं. प्रेक्षकांनी आधी मला खूप गोड भूमिकेत बघितलं आहे. पण, जे मी करणार आहे ते खूप आव्हानात्मक आहे. मलाही वाटलं नव्हतं की मी असं कधीतरी करेन. मला ही भूमिका साकारताना खूप मजा येत आहे.”
ती प्रेक्षकांना उद्देशून असेही म्हणाली, “आतापर्यंत तुम्ही मला जे बघितलं आहे, त्यापेक्षा ही भूमिका खूप वेगळी असणार आहे. या पात्रामध्ये तुम्हाला सगळे रंग बघायला मिळतील. सगळ्या छटा बघायला मिळतील.”
‘इच्छाधारी नागीण’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत शिवानीबरोबरच अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. अजिंक्य ननावरे, आस्ताद काळे, मयुरी वाघ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
दरम्यान, आता शिवानीची ही नवीन भूमिका प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
