अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मध्यंतरीच्या काळात ती छोट्या पडद्यापासून दूर होती. पण आता ती नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अक्षरा असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. सध्या या मालिकेची आणि तिच्या भूमिकेची खूप चर्चा आहे. यानिमित्ताने सध्या ती अनेक मुलाखती देत आहे. तर आता तिने आणि तिचा नवरा विराजस कुलकर्णीने एक मुलाखत दिली त्यात शिवानीने विराजसला कोणता धडा शिकवला आहे याचं शिवानीने उत्तर दिलं आहे.
शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय कपल आहे. गेल्या वर्षी ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्यातलं बॉण्डिंग आणि त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच खूप आवडते. आता “शिवानीने तुला आतापर्यंत कोणता धडा शिकवला का?” असा प्रश्न विराजसला ‘मज्जा’ यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आल्यावर शिवानी व विराजस यांनी मिळून याचं उत्तर दिलं.
आणखी वाचा : “विराजसने मला…” शिवानी रांगोळेने सांगितलं बरेच महिने छोट्या पडद्यापासून दूर राहिल्याचं कारण
विराजस म्हणाला, “मी म्हणूनच तिला म्हटलं की तू ही भूमिका स्वीकार म्हणजे जे काही धडे शिकवायचे ते तू मालिकेतल्या नवऱ्याला शिकवशील आणि घरी आल्यावर फक्त लाड करता येतील.” तर शिवानी गमतीत म्हणाली, “मी अख्ख लग्न केलं आहे त्याच्याबरोबर.. आता याहून मोठा काय धडा असणार.” तर त्यावर विराजस म्हणाला, “जोपर्यंत ती धडे शिकवत आहे तोपर्यंत मला काहीही प्रॉब्लेम नाही. कारण एकमेकांना शिकवणं हे कुठल्याही नात्यात महत्त्वाचं असतं. पण जोपर्यंत ती अद्दल घडवत नाही तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नाही.”
हेही वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला
आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं असून त्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यात असलेली मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.