‘तारिणी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या शिवानी सोनारचं बालपण पुण्यात गेलं. त्यामुळे गणेशोत्सवाशी तिचं खास नात जोडलं गेलं आहे. याशिवाय माहेरच्या आणि सासरच्या बाप्पाविषयी तिच्या खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. बाप्पाची मूर्ती निवडण्याची परंपरा, पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन आणि सासूबाईंकडून उकडीचे मोदक शिकण्याची इच्छा, याबद्दल शिवानी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवानी सोनार सांगते, “माझ्या माहेरी आणि सासरी अशा दोन्ही ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन होतं. माहेरी १० दिवसांचा आणि सासरी दीड दिवसांचा गणपती असतो. गणेशोत्सव हा माझ्यासाठी सर्व सणांमध्ये अतिशय लाडका आणि आवडता सण आहे. मी पुण्याची असल्यामुळे मी एक नियम केला आहे की, मानाच्या पाच गणपतींचं दर्शन नक्की घ्यायचं. मला जसा वेळ मिळेल तसं मी आवर्जून पुण्यातील या मानाच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाते आणि बाप्पाचे आशीर्वाद घेते.”

शिवानी पुढे सांगते, “बाप्पासाठी आरास आणि डेकोरेशन करायला मला पूर्वीपासूनच आवडतं. पण सध्या शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. मात्र, कोणाला काही आयडिया देणं किंवा ऑनलाइन शॉपिंग करणं, हे माझं काम सुरूच असतं. माझ्या माहेरी आमच्या बाप्पाची मूर्ती कायम मीच निवडते. आता ती एक परंपराच झाली आहे आणि माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे. गणपतीच्या काळात मला जेव्हा-जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या परिसरात गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांचे स्टॉल्स आवर्जून पाहते. याशिवाय वेगवेगळ्या मूर्तीकारांच्या स्टॉलवर जाऊन मूर्ती बघायला मला फार आवडतं. प्रत्येक मूर्ती वेगळी असते. बाप्पाचे हावभाव, त्यांची ठेवण, रूपरंग सगळं निरखायला मला प्रचंड आवडतं.”

“दरवर्षी मी मोदक करतेच; पण यावर्षी सुबक-सुरेख उकडीचे मोदक करायचं मी ठरवलं आहे. तळणीचे मोदक मला जमतात, पण उकडीचे मोदक अजूनही मला फारसे चांगले जमत नाहीत. ते मला शिकायचे आहेत आणि यावर्षी मी माझ्या सासूबाईंकडून ते शिकून घेणार आहे.” असं शिवानीने सांगितलं.
