Shivani Sonar Mother In Law : अभिनेत्री शिवानी सोनार सध्या तिच्या ‘तारिणी’ मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षभरात शिवानीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. याशिवाय सर्वत्र ‘तारिणी’ ही नवीन ओळख तिला मिळाली आहे. शिवानीचा नवरा अंबर गणपुळे सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या अंबर ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेत काम करतोय आणि शिवानीच्या सासुबाईंची सुद्धा घराघरांत चर्चा होतेय. याबाबत जाणून घेऊयात…
शिवानीच्या सासूबाई आरती गणपुळे या सुगरण आहेत. त्या नवनवीन आणि विविध पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीजचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. ‘सासूबाई म्हणे’ ( Sasubai Mhane ) असं त्यांच्या अकाऊंटचं नाव आहे. अंबाडीच्या पातळ भाजीपासून ते चिकन बिर्याणीपर्यंत अशा सगळ्या पदार्थांचे व्हिडीओ त्यांनी शेअर केलेले आहेत.
आरती गणपुळे यांच्या ‘सासूबाई म्हणे’ या इन्स्टाग्राम अकाऊंटचे फॉलोअर्स तब्बल १ लाखांहून अधिक आहेत. त्यांना गृहिणी फॉलो करतात आणि कमेंट्समध्ये नवनवीन पदार्थांचे व्हिडीओ शेअर करायला सांगतात. याशिवाय जेवण बनवतानाच्या विविध टिप्स सुद्धा त्या गृहिणींबरोबर शेअर करतात.
आता लवकरच शिवानीच्या या सुगरण सासूबाई ‘झी मराठी’च्या ‘आम्ही सारे खवय्ये!’ या शोमध्ये एन्ट्री घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर शिवानी सुद्धा उपस्थित राहणार आहे. याच्या शूटिंगचा BTS व्हिडीओ या सासू-सुनेच्या जोडीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
“सासू-सून दोघीही बेस्ट”, “दोघींना खूप प्रेम”, “शिवानी तुझ्या सासूबाई किती सुंदर दिसतात”, “इतकी गोड सासू आणि सुनेची जोडी म्हटल्यावर एपिसोड बघणारच”, “सासुबाई म्हणे म्हणजे ऑलटाइम फेव्हरेट… खूप छान-छान पदार्थ करून खाऊ घालणं हाच तर त्यांचा छंद”, “खरी सुगरण गृहिणी..” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत शिवानीने तिला सासुबाईंच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याविषयी सांगितलं होतं, “माझ्या सासूबाईंच्या हातचा ‘स्टॉबेरीखंड’ हा पदार्थ मला खूप आवडतो. त्या तो खूप छान करतात.” असं ती म्हणाली होती. सध्या शिवानी ‘तारिणी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. तिची ही मालिका रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते.
