शिवानी सोनार मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. शिवानी अनेकदा तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीने अशातच आता तिच्या सासूबाईंबद्दल सांगत त्यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना कौतुक केलं आहे. यावेळी तिच्या सासूबाईंनीही तिचं कौतुक केलं आहे.
शिवानी सोनारने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाआधीच ती कधीच स्वयंपाक घरात गेली नव्हती आणि तिला जेवण बनवता येत नव्हतं मात्र लग्नानंतर हळूहळू ती तिच्या सासूबाईंकडून नवीन पदार्थ बनवायला शिकत आहे असं सांगितलं आहे. यावेळी तिने तिचा नवरा अभिनेता अंबर गणपुळेपेक्षाही तिच्या सासूबाईंनी तिला सासरी रुळण्यात जास्त मदत केल्याचं म्हटलं आहे.
शिवानीने केलं सासूबाईंचं कौतुक
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिली तिच्या सासूबरोबरचा बाँड कसा आहे याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “आमचा एका सामान्य सासू-सुनेसारखा बाँड नाहीये. लग्नानंतर जेव्हा एक मुलगी तिचं घर सोडून सासरी येते तेव्हा तिला जी स्पेस लागते ती अंबरपेक्षाही जास्त त्यांनी माझ्यासाठी तयार केली. मी लग्नाआधी कधीच स्वंपाक केला नाही, पण त्यांनी माझ्यामध्ये त्या कलेबद्दल आवड निर्माण केली त्यामुळे आता मी हळूहळू जेवण बनवायला शिकत आहे.”
सासूबाईंनी केलं शिवानीचं कौतुक
शिवानीचं कौतुक करताना तिच्या सासूबाई म्हणाल्या, “शिवानीमध्ये अनेक चांगले गुण आहेत. पण एखाद्या नवीन घरात गेल्यानंतर आपण म्हणतो की मी तिथे रुळेलं की नाही पण तशी भीती तिला कधीच वाटली नाही. मला असं कधी वाटलंच नाही की ती नवीन सून आहे. ती सगळ्यांशी जमवून घेते. सगळ्यांशी खूप चांगलं नातं आहे तिचं. माझी दीड वर्षांची नात आह तिच्याबरोबरही तिचं खूप चांगलं जमतं”.
शिवानी सोनारने पुढे तिच्या आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे ती आतापर्यंत सगळ्या गोष्टी मिळवू शकली आणि त्यांचा जसा पाठिंबा आहे तसाच तिला तिच्या सासू-सासऱ्यांचाही पाठिंबा आहे असं तिने सांगितलं आहे. यावेळी शिवानीच्या सासूबाईंनी तिच्या मालिकेचंही कौतुक केलंय. शिवानीच्या सासूबाईंनी तारिणी सारख्या आव्हानात्मक मालिकेत ती काम करत असल्याने तिचं कौतुक केलंय.
शिवानीने या मुलाखतीत तिच्या सासू-सासऱ्यांनाही अभिनयाची आवड असल्याचं सांगितलं. तर तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि नणंदेनेही नाटकांमध्ये काम केलं असून तिचा सासरे आजही अभिनय करतात असं म्हटलं आहे.
